कोलकाता विरूद्धच्या सामन्यात राजस्थानच्या संघाला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. युवा सलामीवीर शुबमन गिल आणि इयॉन मॉर्गन यांच्या झुंजार खेळीच्या जोरावर कोलकाताने ६ बाद १७४ धावा केल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने मात्र झटपट गडी गमावले. शेवटच्या काही षटकांमध्ये टॉम करनने फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं, पण तोपर्यंत सामना राजस्थानच्या हातून निसटला होता. कोलकाताचे नव्या दमाचे गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी यांनी भेदक मारा करत संघाला ३७ धावांनी विजय मिळवून दिला. या पराभवामुळे राजस्थानला गुणतालिकेमधील दुसरे गमावावे लागले असून ते तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. तर दुसरीकडे विजय मिळवल्याने कोलकात्याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी कायम आहे.

पहिल्या १२ सामन्यांनंतर गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्रत्येकी दोन विजयांसहीत चार गुणांसोबत अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. नेट रनरेटच्या हिशोबाने दिल्ली कॅपिटल्स इतर तीनही संघांइतकेच गुण असूनही अव्वल आहे. दिल्ली वगळता पहिल्या चार संघांपैकी केवळ कोलकात्याची धावगती सकारात्मक आहे. राजस्थान आणि बंगळुरुची धावगती ही नकारात्मक म्हणजेच उणे आहे. पाचव्या स्थानी पंजाबचा संघ आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेमध्ये दोन परभवांसहीत सहाव्या स्थानी गेला आहे. मुंबईच्या खालोखाल सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नईचा संघ आहे. चेन्नई तळाशी असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

गेल्या सामन्यात अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्याविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे गुरुवारी होणाऱ्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब विजयीपथावर परतण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. आजच्या समान्यामध्ये विजय मिळवणारा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल चार संघामध्ये जाईल. तर पराभव होणारा संघ गुणतालिकेच्या तळाशी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आजच्या सामन्यातील विजय हा मुंबई आणि पंजाब दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. आयपीएलच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.