आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफची शर्यत आता अधिक रंगतदार होताना दिसत आहे. चेन्नई सुपरकिंग्ज हा एकमेव संघ सध्या प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु या तीन संघांना फक्त एका विजयाची गरज आहे. तर उर्वरित संघामध्ये चौथ्या स्थानावर येण्याची धडपड सुरु आहे. साखळी फेरीतले अवघे काही सामने आता शिल्लक राहिलेले असताना, काय आहेत प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठीच्या शक्यता, तुमच्या आवडत्या संघाला मिळेल का प्ले-ऑफचं तिकीट पाहूयात…

१) सनराईजर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या पराभवानंतर दिल्लीचा संघ आता फक्त १८ गुणांपर्यंत मजल मारु शकतो. कोलकाता आणि पंजाब हे १६ गुणांपर्यंत पोहचू शकतात.

२) कोणाताही संघ जास्तीत जास्त २० गुणांपर्यंत पोहचू शकतो.

३) सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन संघचं २० गुणांचा टप्पा गाठू शकतात, त्यामुळे एक संघ २० गुणांपर्यंत पोहचला तर दुसरा पोहचू शकणार नाही.

४) साखळी सामन्यांच्या अखेरीस गुणतालिकेत पहिलं स्थान पटकवाण्याची संधी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु या तीन संघांकडे आहे.

५) याव्यतिरीक्त कोलकाता, पंजाब, राजस्थान आणि हैदराबाद या संघांना एकमेकाच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे.

६) मुंबई आणि बंगळुरु या दोन संघांकडे गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावण्याची जास्त संधी आहे.

७) हैदराबादविरुद्ध सामन्यात पराभव झाल्यानंतरही दिल्लीकडे पहिलं स्थान पटकावण्याची संधी आहे, परंतू यासाठी त्यांना बहारदार खेळ करण्याची गरज आहे.

८) दिल्लीविरुद्ध सामन्यात विजय मिळवल्यानंतर हैदराबादसाठी प्ले-ऑफच्या आशा अजुन कायम आहे. परंतू यासाठी त्यांना आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार असून इतर सामन्यांचा निकाल हा त्यांच्या बाजूने लागू दे अशी प्रार्थना करावी लागणार आहे.

आयपीएलचा तेरावा हंगाम हा अपेक्षेपेक्षा जास्त रंगतदार झाला आहे. काही दिवसांपूर्वी गुणतालिकेत तळाशी असलेल्या पंजाबने सलग सामने जिंकून प्ले-ऑफमध्ये आपली दावेदारी सांगणं. यानंतर अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली, मुंबई, बंगळुरु यांच्या पदरात आलेला पराभव त्यामुळे अजुनही प्ले-ऑफमध्ये एकही संघ आपलं स्थान निश्चीत करु शकलेला नाही. बुधवारी मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्यात जिंकणारा संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होईल.