अंतिम फेरी गाठण्याच्या उद्देशाने आज चुरशीची झुंज

अबू धाबी : योग्य वेळी सांघिक समन्वय जुळून आल्याने शानदार आगेकूच करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादचे रविवारी सातत्याचा अभाव असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या ‘क्वालिफायर-२’ सामन्यात पारडे जड मानले जात आहे.

गेल्या दोन आठवडय़ांचा आढावा घेतल्यास हैदराबाद आणि दिल्ली या दोन्ही संघांची ताकद स्पष्ट होऊ शकते. साखळीच्या पहिल्या टप्प्यात प्रभाव न पाडू शकलेल्या हैदराबादने उत्तरार्धातील तिन्ही सामने जिंकत बाद फेरी गाठली. मग कर्णधार डेव्हिड वॉर्नरने खेळाडूंचा योग्यरीत्या वापर करीत शुक्रवारी ‘एलिमिनेटर’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला नमवण्याची किमया साधली. दुसरीकडे, दिल्लीचा संघ साखळीच्या पहिल्या टप्प्यात नऊपैकी सात सामने जिंकून जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र त्यानंतर दिल्लीची कामगिरी खालावली आणि पुढील सहा सामन्यांपैकी पाच सामने त्यांनी गमावले. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर दिल्लीला प्रथमच अंतिम फेरीपर्यंत नेण्यासाठी उत्सुक आहे, तर वॉर्नर २०१६नंतर हैदराबादला दुसऱ्यांदा जेतेपद मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे.

आमनेसामने सामने १७

                             हैदराबाद                           दिल्ली

विजय                         ११                                  ७

सर्वोच्च धावसंख्या       २१९                              १८९

नीचांकी धावसंख्या       ११६                               ८०

यंदाच्या हंगामातील सामने

’ २९ सप्टेंबर : हैदराबाद १५ धावांनी विजयी

’ २७ ऑक्टोबर : हैदराबाद ८८ धावांनी विजयी

दिल्लीला चिंता आघाडीच्या फळीची

आघाडीच्या फळीतील सातत्याचा अभाव ही दिल्लीची प्रमुख डोकेदुखी आहे. पहिल्या तीन स्थानांचा विचार केल्यास शिखर धवन (१५ सामन्यांत ५२५ धावा) आपली भूमिका चोख बजावत आहे. पृथ्वी शॉचे (१३ सामन्यांत २२८ धावा) तंत्र मात्र अव्वल दर्जाच्या वेगवान माऱ्यापुढे थिटे पडत आहे, तर अजिंक्य रहाणे (७ सामन्यांत १११ धावा) आतापर्यंत एकमेव लक्षणीय खेळी साकारू शकला आहे. आघाडीच्या फळीच्या फलंदाजांच्या भोपळ्यांचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. धवन चार वेळा, पृथ्वी तीनदा आणि रहाणे दोनदा शून्यावर बाद झाला आहे. दिल्लीच्या गोलंदाजीच्या फळीने पहिल्या ‘क्वालिफायर’सह अनेकदा त्यांना मदतीचा हात दिला आहे. कॅगिसो रबाडा (२५ बळी), आनरिख नॉर्किए (२० बळी) आणि रविचंद्रन अश्विन यांनी दिल्लीच्या विजयांत मोलाचे योगदान दिले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज डॅनियन सॅम अपेक्षांची पूर्तता करू शकलेला नाही. त्यामुळे फलंदाजीची ताकद वाढवण्यासाठी शिम्रॉन हेटमायरला संधी मिळू शकते. हे समीकरण आखल्यास मार्कस स्टॉइनिसला चार षटके गोलंदाजी करता येऊ शकेल.

विल्यम्सन धोकादायक

मागील चार सामन्यांत हैदराबादची फलंदाजी ही सर्वार्थाने वर्चस्व गाजवू लागली आहे. वॉर्नरने वृद्धिमान साहाच्या साथीने दिमाखात सलामी दिली होती. पण दुखापतीमुळे बेंगळूरुविरुद्धच्या सामन्याला मुकलेला साहा दिल्लीविरुद्धही खेळू शकणार नाही. जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आपली भूमिका चोख बजावत आहेत. विजयवीराची भूमिका बजावणारा केन विल्यम्सन धोकादायक सिद्ध होत आहे. जेसन होल्डर अष्टपैलूत्व सिद्ध करीत आहे. सहा सामन्यांत १३ बळी घेणारा होल्डर मधल्या फळीत आत्मविश्वासाने फलंदाजी करीत आहे. रशीद खानच्या फिरकीचा सामना करणे दिल्लीला आव्हानात्मक ठरेल. टी. नटराजन आणि संदीप शर्मा टिच्चून गोलंदाजी करीत आहेत. मधल्या फळीतील प्रियम गर्ग आणि अब्दुल समाद यांचा अननुभव हे हैदराबादचे कच्चे दुवे आहेत.

’  सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या