आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून आपला पहिला सामना खेळणाऱ्या रविचंद्रन आश्विनने आपल्या माजी संघाला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना आश्विनने एकाच षटकात करुण नायर आणि निकोलस पूरन या फलंदाजांना माघारी धाडत दिल्लीची बाजू वरचढ केली. परंतू यादरम्यान एकेरी धाव वाचवताना आश्विनच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. त्याच्या बदली अजिंक्य रहाणे बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला.

२०१९ साली रविचंद्रन आश्विन पंजाब संघाचा कर्णधार होता. मात्र तेराव्या हंगामासाठी पंजाबने Player Transfer Window अंतर्गत आश्विनला दिल्लीच्या संघात दिलं. गेल्या काही दिवसांपासून आश्विनला संघात स्थान मिळणार की नाही यावरुन चर्चा सुरु होती. परंतू दिल्लीने पहिल्या सामन्यात अमित मिश्राला बाहेर बसवून आश्विनला संधी दिली. आश्विननेही आपल्यावर दाखवण्यात आलेला विश्वास सार्थ ठरवत संघाला दोन महत्वपूर्ण बळी मिळवून दिले. त्यामुळे येत्या काळात आश्विनच्या दुखापतीबद्दल नेमकी काय माहिती मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.