शारजाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकत संघाला थरारक विजय मिळवून दिला. पंजाबने राजस्थानला विजयासाठी २२४ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. जोस बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतू अष्टपैलू राहुल तेवतिया संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला.

मोक्याच्या क्षणी स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन माघारी परतल्यानंतर तेवतियाने एक बाजू लावून धरली. शेल्डन कोट्रेलच्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचले आणि सामन्याचं चित्रच पालटलून टाकलं. तेवतियाच्या फटकेबाजीमुळे पिछाडीवर पडलेलं राजस्थान एकदम आघाडीवर आलं. आयपीएलमध्ये एकाच षटकात पाच षटकार ठोकण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी तेवतियाने बरोबरी केली.

३१ चेंडूत ७ षटकार खेचत तेवतियाने ५३ धावा केल्या. अखेरच्या षटकांत शमीने तेवतियाला तर मुरगन आश्विनने रियान परागला माघारी धाडत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतू टॉम करनने चौकार खेचत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.