करोनाचा धोका लक्षात घेता IPL 2020 स्पर्धा युएईला हलवण्यात आली. १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर असा स्पर्धेचा कालावधीही निश्चित करण्यात आला. पण सर्व संघ नियमानुसार युएईत दाखल झाले आणि क्वारंटाइन कालावधी संपवून सरावाला उतरले तरीही स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नव्हते. अखेर रविवारी (६ सप्टेंबर) IPL 2020चे वेळापत्रक जाहीर झाले. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि उपविजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरूवात होणार हे ठरलं. इतरही सर्व संघांना आपले सामने कधी आणि कोणासोबत आहे याची कल्पना आली.

वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विविध संघांनी आपल्या चाहत्यांच्या सोयीसाठी आपले सामने कोणत्या संघासोबत आहेत आणि कोणत्या दिवशी आहेत याचे चार्ट तयार केले. काहींनी व्हिडीओ आणि अॅनिमेशनचा आधार घेतला. काहींनी लोगो वापरून वेळापत्रकातील आपले सामने अधोरेखित केले. RCBच्या संघाने कल्पकतेने सर्व विरोधी संघांचे लोगो वापरून चाहत्यांना ‘तुमचा आवडता सामना कोणता?’ असा प्रश्न विचारला. चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिसाद दिला.

याच प्रश्नावर एक रिप्लाय आला तो राजस्थान रॉयल्सचा. RCBने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये राजस्थान संघाचा जुना लोगो वापरण्यात आला होता. त्यामुळे राजस्थानने RCBला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. एक छोटा कार्टूनरूपी मुलगा चूक झाल्यानंतर तेच वाक्य किंवा शब्द अनेकदा लिहून काढण्याची शिक्षा भोगतो तसं राजस्थान संघाने RCBला ट्रोल केलं. ‘मी राजस्थान रॉयल्स संघाचा योग्य लोगो वापरेन’, असं फळ्यावर खूप वेळा लिहिणारा मुलगा फोटोत दाखवत त्यांनी RCBची खिल्ली उडवली.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील पहिला सामना ३ ऑक्टोबरला होणार आहे. तर दुसरा सामना १७ ऑक्टोबरला रंगणार आहे.