इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

बेन स्टोक्सच्या आगमनामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या राजस्थान रॉयल्स संघाची फलंदाजी आता अधिक मजबूत झाली आहे. परंतु इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गेल्या आठवडय़ात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानला ४६ धावांनी धूळ चारली होती. बुधवारी होणाऱ्या परतीच्या लढतीत त्या पराभवाची परतफे ड करण्यासाठी स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ उत्सुक आहे.

स्टोक्स दिल्लीविरुद्धच्या पहिल्या लढतीप्रसंगी राजस्थानच्या ताफ्यात नव्हता. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात स्टोक्सची कामगिरी समाधानकारक नसली, तरी हा अष्टपैलू खेळाडू सामन्याचे चित्र पालटू शकतो. स्टोक्स परतल्याने राजस्थान संघाचा उत्तम समतोल साधला गेला आहे, असे स्मिथनेही सांगितले.

राजस्थानला आघाडीची फळी निश्चित करण्याची नितांत आवश्यकता आहे. स्मिथ आणि संजू सॅमसन यांना हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमधील सातत्य कायम राखता आले नाही. जोस बटलरने मुंबई इंडियन्सविरुद्ध ४४ चेंडूंत ७० धावांची धडाके बाज खेळी साकारली. पण तोही मागील दोन सामन्यांत अपयशी ठरत आहे.

राहुल तेवतिया पुन्हा राजस्थानसाठी तारणहार ठरला. पंजाबविरुद्ध पाच षटकारांसह विजयी खेळी साकारणाऱ्या राहुलने हैदराबादविरुद्ध २८ चेंडूंत ४५ धावा करीत संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला. जोफ्रा आर्चरच्या नेतृत्वाखालील राजस्थानच्या गोलंदाजीच्या माऱ्यात तेवतिया आणि श्रेयस गोपाळ यांच्यावर फिरकीची मदार असेल.

दिल्लीने याआधीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध हार पत्करली आहे. दिल्लीचा संघ या पराभवातून सावरेल, अशी आशा आहे. दिल्लीकडे शिखर धवनला सूर गवसला आहे, तर पृथ्वी शॉ आणि अय्यर सातत्याने धावा करीत आहेत. परंतु यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे आठवडाभर खेळू शकणार नसल्याने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स कॅ रीकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी जाऊ शकेल. त्यामुळे शिम्रॉन हेटमायरला विश्रांती द्यावी लागणार आहे. या स्थितीत रहाणेलाही संधी मिळू शकते.

हंगामातील सर्वाधिक १७ बळी घेणारा गोलंदाज कॅ गिसो रबाडासुद्धा दिल्लीकडे आहे. दक्षिण आफ्रि के चा आनरिख नॉर्किए (८ बळी) आणि हर्षल पटेलची त्याला तोलामोलाची साथ लाभत आहे. रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल प्रभावी फिरकी मारा करीत आहेत. दिल्लीची भिस्त  मार्कस स्टॉइनिसवरही आहे.

* वेळ : सायं.७.३०वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या

गेल बेंगळूरुविरुद्धच्या लढतीसाठी तंदुरुस्त

अन्न विषबाधेतून सावरलेला किंग्ज इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. गेल्या आठवडय़ात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध गेलला खेळवणार होतो. परंतु अन्नातून विषबाधा झाल्याने त्याला खेळवू शकलो नव्हतो. त्यानंतर शनिवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यालाही तो मुकला, अशी माहिती पंजाब संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी दिली होती.