मुंबई आणि बंगळुरु यांच्यात दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये अखेरीस बंगळुरुने बाजी मारली. मुंबईने विजयासाठी दिलेलं ८ धावांचं आव्हान आरसीबीने सहज पूर्ण केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीने बाजी मारली असली तरीही या सामन्यामधील अनेक खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक होताना दिसत आहे. यामध्ये अगदी ९९ धावांची खेळी करणारा मुंबई इंडियन्सच्या इशान किशन असो किंवा सुपरओव्हर टाकताना टिच्चून मारा करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी न देणारा नवदीप सैनी असो, सर्वांनीच आपल्या कामगिरीच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली. मात्र भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुपर ओव्हरमधील खेळाडू किंवा स्फोटक फलंदाजी करणारे तरुण भारतीय फालंदाज यांच्या खेळीऐवजी एका गोलंदाजाचे अगदी मनापासून कौतुक केलं आहे. रवी शास्त्री यांनी ट्विटवरुन यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.

रवी शास्त्री यांनी ट्विटवरुन बंगळुरुचा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरचं कौतुक केलं आहे. “फंलंदाजांच्या या जगामध्ये चेन्नईच्या वॉशिंग्टनने कमाल केली. २०२० च्या आयपीएलमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. खरोखरच स्पेशल कामगिरी केलीय याने,” असं ट्विट रवी शास्त्री यांनी केलं आहे.

वॉशिंग्टन सुंदरने चार षटकांमध्ये केवळ १२ धावा दिल्या. मुंबईच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्याच षटकामध्ये १४ धावा काढल्यानंतर विराटने दुसरेच षटक टाकण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरची निवड केली. आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थक ठरवत वॉशिंग्टनने पहिल्या तीन चेंडूंवर एकही धाव रोहितला दिली नाही. चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित नेगीकडे झेल देत माघारी परतला. रोहित अवघ्या आठ धावांवर बाद झाल्याने २०० हून अधिक धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातच अडखळत झाली. रोहित बाद केलेल्या षटकात वॉशिंग्टनने केवळ दोन धावा दिल्या. आपल्या दुसऱ्या षटकात त्याने केवळ एक धावा दिली. तिसऱ्या षटकात चार तर चौथ्या षटकामध्ये वॉशिंग्टनने पाच धावा दिल्या. विशेष म्हणजे आपल्या चार षटकांमधील २४ चेंडूंपैकी ५० टक्के म्हणजेच १२ चेंडू निर्धाव टाकले. मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवर साधा चौकारही मारता आला नाही.