22 January 2021

News Flash

IPL 2020 : RCB कडून विजयाची औपचारिकता पूर्ण, KKR चा ८ गडी राखून धुव्वा

KKR चा निराशाजनक खेळ

फोटो सौजन्य - IPL

अबु धाबीच्या मैदानावर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने KKR वर ८ गडी राखून मात करत धडाकेबाज विजयाची नोंद केली आहे. विजयासाठी अवश्यक असलेल्या ८५ धावांचं आव्हान RCB च्या संघाने सहज पूर्ण केलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना KKR चा डाव RCB च्या माऱ्यासमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत KKR ची दाणादाण उडवली. RCB ने विजायासाठीचं आव्हान १४ व्या षटकात पूर्ण केलं.

८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना RCB च्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. फिंच आणि देवदत पडीकल यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागादारी केली. फलंदाजीत निराशाजनक कामगिरी केलेल्या KKR च्या संघाने गोलंदाजीतही फारशी चमक दाखवली नाही. मागच्या सामन्यात गोलंदाजीत चमक दाखवलेल्या लॉकी फर्ग्युसनला पॉवरप्ले नंतर गोलंदाजीची संधी दिली. फर्ग्युसनने संधी मिळताच फिंचला माघारी धाडत RCB ला पहिला धक्का दिला. देवदत पडीकलही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि गुरकिरत मान यांनी अधिक जोखीम न घेता पडझड होणार नाही याची काळजी घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी, मोहम्मद सिराज, ख्रिस मॉरिस, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फॉर्मात असलेल्या गोलंदाजांसमोर अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी संपूर्णपणे हार पत्करल्याचं पहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा KKR चा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला. सुरुवातीच्या षटकांपासून KKR च्या डावाला लागलेली गळती थांबवण्यात संघाचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकांत संघ अवघ्या ८४ धावांपर्यंत मजल मारु शकला.

नाणेफेकीचा निर्णय घेत कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी ही जोडी मैदानावर आली. परंतू RCB च्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांपासूनच भेदक मारा करत KKR वर दडपण आणलं. मोहम्मद सिराजने मिळालेल्या संघीचं सोनं करत एकाच षटकात राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा यांना माघारी धाडलं. यानंतर KKR च्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. शुबमन गिल देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मैदानावर फटकेबाजी करु पाहणाऱ्या टॉम बँटनलाही सिराजने माघारी धाडत KKR समोरची अडचण अधिकच वाढवली.

मोहम्मद सिराजने एकाच सामन्यात दोन षटकं निर्धाव टाकून ३ बळी घेत आयपीएलच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली. फलंदाजीसाठी कर्णधारपद सोडलेला दिनेश कार्तिकही फारशी चमक दाखवू शकला नाही. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर १४ चेंडूत ४ धावा काढत तो माघारी परतला. चहलनेच पॅट कमिन्सला देवदत पडीकलकरवी झेलबाद करत माघारी धाडलं. KKR चा कर्णधार मॉर्गन एक बाजू सांभाळून होता…परंतू समोरच्या फलंदाजांकडून सपोर्ट मिळत नसल्यामुळे फटकेबाजीच्या प्रयत्नात त्यानेही आपली विकेट फेकली. कुलदीप यादव आणि लॉकी फर्ग्युसन यांनी अखेरच्या षटकांत पडझड रोखत संघाला ८४ धावांचा टप्पा गाठून दिला. RCB कडून मोहम्मद सिराजने ३, युजवेंद्र चहलने २ तर नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 9:08 pm

Web Title: ipl 2020 rcb beat kkr by 8 wickets psd 91
Next Stories
1 IPL 2020 : KKR च्या फलंदाजांचं घालिन लोटांगण, पॉवरप्लेमध्ये नोंदवली निच्चांकी धावसंख्या
2 0, 0, W, W, 0, 0, 0, 0, W IPL मध्ये सिराजची विक्रमी कामगिरी
3 IPL 2020 : CSK चा पाय आणखी खोलात, ब्राव्होची दुखापतीमुळे माघार
Just Now!
X