आयपीएल म्हटलं की दीड-दोन महिने चालणारी स्पर्धा, रात्रीपर्यंत रंगणारे सामने हे समीकरण आपल्या सर्वांच्या मनात पक्कं झालंय. अनेकदा आयपीएलच्या या हंगामात खेळाडूंना दुखापतींना सामोरं जावं लागतं. प्रत्येक संघमालक आपल्या खेळाडूंचा फिटनेस कायम राखला जावा यासाठी फिजीओ पासून मसाज करणाऱ्या व्यक्तीची खास नेमणूक करत असतं. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला आतापर्यंत एकही आयपीएल विजेतेपद मिळवता आलं नाही. अनेक हंगामात RCB ची कामगिरी ही यथातथाच असते. परंतू गेल्या १२ हंगामात अनेक चढ-उतार येऊनही एक मराठी माणूस RCB खेळाडूंच्या फिटनेसची काळजी घेत आहे.

RCB च्या खेळाडूंना मसाज करणारे रमेश माने पहिल्या हंगामापासून संघासोबत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून निष्ठेने आपलं काम करणाऱ्या माने काकांच्या कार्याबद्दल RCB ने एका छोटासा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. स्थानिक पातळीपासून काम सुरु केलेल्या रमेश माने यांना एकदिवस रणजी ट्रॉफीदरम्यान सचिनच्या पाठीचं दुखणं बरं करण्याची संधी मिळाली. यानंतर माने काकांचा स्वप्नवत प्रवास सुरु झाला. आधी रणजी करंडक मग भारतीय संघ आणि आता आयपीएलमध्ये RCB च्या खेळाडूंचा मसाज करण्याची आणि त्यांचा फिटनेस कायम राखण्याची जबाबदारी काकांवर आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ दोन विजयांसह चौथ्या स्थानी आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत RCB च्या संघाची कामगिरी आश्वासक असली तरी गोलंदाजांची खराब कामगिरी हा RCB साठी चिंतेचा विषय आहे.