आयपीएलच्या बाराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत असताना रविचंद्रन आश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मंकडींग करत केलेलं रनआऊट आजही चर्चेचा विषय आहे. मंकडींग योग्य की अयोग्य यावरुन आजही क्रिकेटप्रेमींमध्ये अनेक चर्चा रंगतात. आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्लीकडून खेळणाऱ्या रविचंद्रन आश्विनला यंदा प्रशिक्षक रिकी पाँटींगने मंकडींग करण्याची परवानगी नाकारली होती. या मुद्द्यावरुन दोघांमध्ये स्पर्धेला सुरवात होण्याआधी चर्चाही झाली होती. आश्विनचा मुद्दा योग्य असला तरीही मंकडींग करुन विजय मिळवण्याने मनात पोकळ भावना तयार होते असं म्हणत पाँटींगने आश्विनला परवानगी नाकारली होती.

दुबईच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धचा सामना खेळत असताना रविचंद्रन आश्विनला पुन्हा एकदा मंकडींग करण्याची संधी चालून आली होती. सामन्यात तिसरं षटक टाकत असताना आश्विनच्या गोलंदाजीवर नॉन-स्ट्राईक एंडला उभा असलेला फिंच चेंडू टाकण्याआधीच धाव घेण्यासाठी पुढे गेला. यावेळी आश्विनकडे त्याला मंकडींग करण्याची संधी होती. परंतू प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनेचं पालन करत आश्विनने फिंचला वॉर्निंग देत क्रिसमध्ये रहायला सांगितलं. यानंतर सोशल मीडियावरही आश्विन चांगलाच व्हायरल झाला आहे. पाहा हा व्हिडीओ…

आश्विनने मंकडींग करण्याचं नाकारत फिंचला वॉर्निंग दिल्यानंतर प्रशिक्षक रिकी पाँटींगनेही त्याला डगआऊटमध्ये बसून हसत-हसत दाद दिली.

फिंचला मंकडींग करण्याची संधी आश्विनने सोडली असली तरीही त्याच षटकात त्याने RCB च्या देवदत पडीकलला बाद केलं. पडीकल आश्विनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ४ धावा काढून माघारी परतला.