एरवी आपल्या खराब कामगिरीमुळे नेहमी चर्चेत असलेल्या RCB संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात चांगलाच सूर गवसला आहे. नेहमी गुणतालिकेत तळातल्या स्थानांमध्ये असणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ यंदा चांगली कामगिरी करतो आहे. गोलंदाजांचा आश्वासाक मारा आणि नवीन खेळाडूंमुळे संघाला मिळालेलं स्थैर्य हे RCB च्या संघाचं आतापर्यंतच्या कामगिरीचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातंय. वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल या दोन गोलंदाजांनी यंदा संघाकडून आश्वासक कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघाच्या धावगतीला खिळ बसवण्याचं काम केलंय.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यातही वॉशिंग्टन सुंदरने आपल्यावर सोपवण्यात आलेली कामगिरी चोख बजावली आहे. कर्णधार विराट कोहलीने वॉशिंग्टनला पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीची संधी देत त्याच्या ४ ही षटकांचा कोटा संपवला. पॉवरप्ले षटकांमध्ये अनेकदा गोलंदाजांना फलंदाजांकडून मार बसलण्याची शक्यता असते. परंतू वॉशिंग्टनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात दिल्लीच्या फलंदाजांना अडकवत त्यांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. सुंदरने ४ षटकांत २० धावा देत दिल्लीच्या धावगतीला अंकुश लावला. या कामगिरीबद्दल भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनेही त्याचं कौतुक केलंय.

आपल्या चार षटकांमध्ये वॉशिंग्टनला एकही बळी घेता आला नसला तरीही त्याने दिल्लीच्या फलंदाजांना चांगलचं अडकवलं. त्यामुळे दिल्लीच्या फलंदाजांनीही सुंदरची गोलंदाजी आरामात खेळून काढत बंगळुरुच्या इतर गोलंदाजांवर हल्ला चढवला.