आयपीएलच्या तेराव्या हंगामात अबु धाबीच्या मैदानात KKR च्या संघाचं पानिपत झालेलं पहायला मिळालं. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत कोलकाता नाईट रायडर्सला ८४ धावांवर रोखलं. पॉवरप्लेच्या षटकांपासून आक्रमक मारा करणारे RCB चे गोलंदाज KKR वर दडपण टाकण्यात यशस्वी ठरले. RCB कडून सामना गाजवला तो मोहम्मद सिराजने. आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत सिराजने ४ षटकांत २ षटकं निर्धाव टाकत अवघ्या ८ धावा देत २ बळी घेतले.

KKR विरुद्ध सामन्याला सुरुवात होण्याआधी मोहम्मद सिराजची इकोनॉमी ही सर्वात खराब होती. पण KKR विरुद्ध सामन्यात सिराजने २ च्या इकोनॉमीने मारा करत आपलं नाण खणखणीत वाजवून दाखवलं.

याचसोबत RCB कडून खेळताना ४ षटकांत कमी धावा देऊन चांगली कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही सिराजला दुसरं स्थान मिळालं आहे.

दरम्यान एकीकडे संघाची पडझड होत असताना कुलदीप यादव आणि लॉकी फर्ग्युसन यांनी अखेरच्या षटकांत पडझड रोखत संघाला ८४ धावांचा टप्पा गाठून दिला. RCB कडून मोहम्मद सिराजने ३, युजवेंद्र चहलने २ तर नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.