तडाखेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान विरूद्धच्या रोमांचक सामन्यात बंगळुरूने ७ गडी राखून विजय मिळवला. राजस्थानच्या संघाने २० षटकात १७७ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यात स्टीव्ह स्मिथचं दमदार अर्धशतक महत्ताचं ठरलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना १८व्या षटकापर्यंत बंगळुरूचा संघ खूपच मागे राहिला होता, पण डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीच्या बळावर शेवटच्या दोन षटकांत ३५ धावा करत बंगळुरूने धमाकेदार विजय मिळवला. बंगळुरूचा हा स्पर्धेतील सहावा विजय ठरला.

१७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या फलंदाजांना अपेक्षित गती मिळाली नाही. फिंच १४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर देवदत्त पडीकल आणि विराट कोहली यांनी चांगली भागीदारी केली पण त्यांना झटपट धावा करता आल्या नाहीत. पडीकल ३५ (३७) तर विराट कोहली ४३ (३२) धावांवर मोठा फटका मारताना बाद झाला. तेवातियाने विराटचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर एबी डीव्हिलियर्स मैदानात असताना बंगळुरूला विजयासाठी १२ चेंडूत ३५ धावांची गरज होती. त्यावेळी स्मिथने उनाडकटला गोलंदाजी दिली आणि डीव्हिलियर्सने त्याला चागलं झोडपून काढलं. ३ षटकार आणि १ चौकारासह उनाडकटने १९व्या षटकात २५ धावा दिल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात उत्तुंग षटकार मारत डीव्हिलियर्सने सामना खिशात घातला.

पाहा डीव्हिलियर्सची झंजावाती खेळी-

नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रथम फलंदाजी निर्णय घेतला. बेन स्टोक्ससोबत सलामीला रॉबिन उथप्पाला पाठवण्यात आले. हा डाव चांगलाच यशस्वी ठरला. उथप्पाने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने एकूण २२ चेंडूत ४१ धावा कुटल्या. तर बेन स्टोक्स १५ धावांवर बाद झाला. संजू सॅमसनही स्वस्तात परतला. पण कर्णधार स्टीव्ह स्मिथने चांगली खेळी केली. त्याला जोस बटलरने साथ दिली. बटलर २४ धावांवर बाद झाला. स्मिथने मात्र अर्धशतकी खेळी केली. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचत ५७ धावा केल्या. शेवटच्या षटकांत राहुल तेवातियाने ११ चेंडूत १९ धावा करत संघाला १७७ पर्यंत नेले. ख्रिस मॉरिसने अप्रतिम गोलंदाजी करत २६ धावांत ४ बळी घेतले. तर चहलने ३४ धावांत २ बळी टिपले.