स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात आश्वासक केली होती. सलामीचे दोन सामने जिंकल्यानंतर राजस्थानच्या संघाची घसरगुंडी सुरु झाली. कामगिरीत सातत्य नसल्यामुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत खालच्या स्थानावर फेकला गेला. गेल्या काही दिवसांपासून स्मिथकडून धावाही होत नसल्यामुळे संघासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतू दुबईच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अखेरीस स्टिव्ह स्मिथला सूर गवसला आहे.

आश्वासक सुरुवात केल्यानंतर राजस्थानचा संघ RCB विरुद्ध सामन्यात संकाटत सापडला. चहलने आपल्या गोलंदाजीवर एकाच षटकात उथप्पा आणि सॅमसन यांना माघारी धाडलं. यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथने जोस बटलरसोबत ५८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या भागीदारीमुळे राजस्थानच्या संघाने सामन्यात पुनरागमन केलं. मैदानावर स्थिरावल्यानंतर स्मिथने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत फटकेबाजीला सुरुवात केली. ३६ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह स्मिथने ५७ धावा केल्या. आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्वाधिक वेळा अर्धशतक झळकावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. यंदाच्या हंगामातलं स्मिथचं हे तिसरं अर्धशतक ठरलं.

अखेरच्या षटकापर्यंत मैदानात तळ ठोकत स्मिथने राजस्थानला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. बटलर आणि तेवतिया यांनीही त्याला उत्तम साथ दिली. राजस्थानने स्मिथच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर RCB विरुद्ध सामन्यात १७७ धावांचा पल्ला गाठला. ख्रिस मॉरिसने स्मिथला बाद केलं.