बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबाद संघाने ५ गडी आणि ३५ चेंडू राखून धडाकेबाज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना फिलिप आणि डीव्हिलियर्स या दोघांच्या छोटेखानी खेळीमुळे बंगळुरूने कशाबशा १२० धावा केल्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून मनिष पांडे आणि वृद्धिमान साहा यांनी दमदार खेळी केल्या, तर अष्टपैलू जेसन होल्डरने तडाखेबंद नाबाद खेळी करत संघाचं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं. पण या पराभवामुळे बंगळुरूला आता दिल्लीविरूद्धचा शेवटचा साखळी सामना जिंकणं अपरिहार्य असणार आहे.

वृद्धिमान साहाची महत्त्वपूर्ण खेळी (३२ चेंडूत ३९ धावा)

जेसन होल्डरचा ‘विराटसेने’ला दणका (१० चेंडूत नाबाद २६)

पहिल्या डावात बंगळुरूच्या फलंदाजांनी निराशा केली. सलामीवीर देवदत्त पडीकल ५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ कर्णधार विराट कोहली ७ धावांवर बाद झाला. डीव्हिलियर्स आणि जोशुआ फिलीप या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात दोघेही झेलबाद झाले. डीव्हिलियर्सने २४ तर फिलीपने ३२ धावा केल्या. नंतर वॉशिंग्टन सुंदरने चांगली फटकेबाजी करत २१ धावा केल्या, पण इतर फलंदाजांनी मात्र खेळपट्टीवर केवळ हजेरी लावली आणि तंबूत परतले. गुरकीरत सिंग झुंज देत १५ धावांवर नाबाद राहिला. संदीप शर्मा, जेसन होल्डरने २-२ तर राशिद खान, शाहबाज नदीम, नटराजन यांनी १-१ बळी टिपला.

सामनावीर संदीपचा भेदक मारा (२० धावांत २ बळी)

१२१ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर लवकर बाद झाला. पण वृद्धिमान साहा आणि मनिष पांडे यांनी डाव सावरला. त्यांनी ३२ चेंडूत ५० धावांची भागीदारी केली. मनिष पांडे ३ चौकार आणि १ षटकार मारून २६ धावांवर बाद झाला. पाठोपाठ साहा ४ चौकार आणि १ षटकार खेचत ३९ धावांवर बाद झाला. त्यानंतर केन विल्यमसन (८) आणि अभिषेक शर्मा (८) झटपट माघारी परतले. पण जेसन होल्डरने १० चेंडू १ चौकार आणि ३ षटकार खेचत नाबाद २६ धावा केल्या.