‘करो वा मरो’ची स्थिती असलेल्या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत बंगळुरूचा डाव ७ बाद १२० धावांवर रोखला. संदीप शर्मा, जेसन होल्डर यांचा भेदक मारा आणि त्याला फिरकीपटूंची मिळालेली साथ याच्या बळावर हैदराबादने विराटसेनेला फटकेबाजीची संधीच दिली नाही. सलामीवीर जोशुआ फिलीप, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर आणि गुरकीरत हे चार फलंदाज वगळता इतरांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. संदीप शर्माने २० धावांत २ बळी टिपले.

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूच्या फलंदाजांनी निराशा केली. सलामीवीर देवदत्त पडीकल ५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ कर्णधार विराट कोहली ७ धावांवर बाद झाला. डीव्हिलियर्स आणि जोशुआ फिलीप या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात दोघेही झेलबाद झाले. डीव्हिलियर्सने २४ तर फिलीपने ३२ धावा केल्या. नंतर वॉशिंग्टन सुंदरने चांगली फटकेबाजी करत २१ धावा केल्या, पण इतर फलंदाजांनी मात्र खेळपट्टीवर केवळ हजेरी लावली आणि तंबूत परतले. गुरकीरत सिंग झुंज देत १५ धावांवर नाबाद राहिला. संदीप शर्मा, जेसन होल्डरने २-२ तर राशिद खान, शाहबाज नदीम, नटराजन यांनी १-१ बळी टिपला.