श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामाची अंतिम फेरी गाठली आहे. आयपीएलच्या इतिहासात अंतिम फेरी गाठण्याची दिल्लीची ही पहिलीच वेळ ठरली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात दिल्लीने हैदराबादची झुंज मोडत काढत अंतिम फेरीत आपलं तिकीट पक्कं केलं. अंतिम फेरीत दिल्लीसमोर गतविजेत्या मुंबईचं आव्हान असणार आहे. हैदराबादवर मात केल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.

“अंतिम फेरी गाठणं ही एक कर्णधार म्हणून सर्वोत्तम भावना आहे. हा प्रवास खूप चढ-उताराचा होता. सरतेशेवटी आम्ही एक संघ म्हणून मैदानावर उतरलो आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. प्रत्येक खेळाडूने संघाच्या विजयासाठी घेतलेली मेहनत कामी आली याचा मला आनंद आहे.” Post match presentation ceremony मध्ये श्रेयस बोलत होता.

प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनीस यांनी ‘पॉवर-प्ले’च्या षटकांत तुफान फटकेबाजी करत ६५ धावा कुटल्या. मार्कस स्टॉयनीस ३७ धावांवर त्रिफळाचीत झाला. पण शिखर धवनने फटकेबाजी सुरू ठेवत दमदार अर्धशतक ठोकलं. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात कर्णधार श्रेयस अय्यर २१ धावांवर माघारी परतला. नंतर शिखर धवनही ५० चेंडूत ७८ धावा काढून बाद झाला. पण शिमरॉन हेटमायरने २२ चेंडूत ४२ धावा करत संघाला १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली.

१९० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर २ धावांवर त्रिफळाचीत झाला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या प्रियम गर्ग (१७) आणि मनिष पांडे (२१) या दोघांना स्टॉयनीसने एका षटकात माघारी पाठवले. अनुभवी जेसन होल्डर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ११ धावांवर बाद झाला. युवा अब्दुल समदच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. त्याने ४५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार खेचत ६७ धावा केल्या.