अबु धाबीच्या मैदानावर रंगलेल्या रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ५ गडी राखून मात करत प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान जळळपास निश्चीत केलं आहे. RCB ने विजयासाठी दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातही काहीशी अडखळत झाली. इशान किशन आणि क्विंटन डी-कॉक चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर माघारी परतले. यादरम्यान तिसऱ्या क्रमांकावऱ फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सूर्यकुमारने आपली जबाबदारी ओळखत RCB च्या गोलंदाजांचा संयमीपणे सामना केला. मैदानात पाय स्थिरावल्यानंतर सूर्यकुमारने RCB च्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत मुंबईसाठी धावांचा ओघ वाढवला.

४३ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने सूर्यकुमारने नाबाद ७९ धावांची खेळी केली. सामना संपल्यानंतर सूर्यकुमारने एका खास व्हिडीओ इंटरव्ह्यूत आपल्या या खेळीचं गूपित सांगितलं. “सर्वात प्रथम मैदानावर स्थिरावणं हे माझ्यासमोरचं पहिलं उद्दीष्ट होतं. यानंतर पहिल्या टाईमआऊटमध्ये ड्रेसिंग रुममधून रोहित आणि महेला सरांनीही मला शेवटपर्यंत खेळत रहा, निकाल आपल्या बाजूनेच लागेल असा संदेश पाठवला…त्याप्रमाणे मी खेळत गेलो.” मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

दरम्यान या सामन्यात हार्दिक पांड्या-ख्रिस मॉरिस, विराट कोहली-सूर्यकुमार यादव यांच्यात मैदानामध्ये चांगलंच युद्ध रंगलेलं दिसलं. RCB च्या गोलंदाजांनी सूर्यकुमारला बाद करण्यासाठी अथक प्रयत्न केले पण त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.