गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपल्या धडाकेबाज कामगिरीचा सिलसिला कायम ठेवला आहे. गोलंदाजांनी केलेल्या बहारदार कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सला १४८ धावांवर रोखलं. एका क्षणाला १०० धावसंख्येचा टप्पा KKR ओलांडू शकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पॅट कमिन्स आणि कर्णधार मॉर्गनने फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. यानंतर १४९ धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनेही चांगली सुरुवात केली.

कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी कोलकाताच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. ८ षटकांनंतर मुंबईच्या संघाने एकही गडी न गमावता ७१ धावांपर्यंत मजल मारली होती. आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबईच्या सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावण्याची मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातलही ही पहिली वेळ ठरली. डी-कॉकने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतक झळकावलं.

कोलकात्याचा कर्णधार मॉर्गनने मुंबईची जोडी फोडण्यासाठी खूप प्रयत्न केले. वरुण चक्रवर्तीने डी-कॉकला दिलेलं जिवदान KKR ला चांगलंच महागात पडलं. मुंबईविरुद्ध सामन्याआधी कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात महत्वाचा बदल केला. दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडून मॉर्गनकडे कमान सोपवली. मात्र नेतृत्वबदलानंतरही KKR च्या कामगिरीत फारसा बदल झालेला दिसला नाही.