20 October 2020

News Flash

IPL 2020 : राजस्थानच्या वादळात CSK चं विमान जमिनीवर

फाफ डु-प्लेसिसची एकाकी झुंज

फोटो सौजन्य - IPL/BCCI

गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दणक्यात सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जचं विमान दुसऱ्याच सामन्यात जमिनीवर आलं आहे. शारजा येथे झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्जवर १६ धावांनी मात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेलं २१७ धावांचं आव्हान चेन्नईला पेलवलं नाही. २० षटकांत चेन्नईचा संघ २०० धावांपर्यंतच मजल मारु शकला.

वॉटसन आणि डु-प्लेसिस या जोडीने डावाची सुरुवात चांगली केली होती. परंतू वॉटसन माघारी परतल्यानंतर चेन्नईचा एकही फलंदाज मोठी भागीदारी करु शकला नाही. फाफ डु-प्लेसिसने एक बाजू लावून धरत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्यामुळे चेन्नईचे प्रयत्न तोकडेच पडले. डु-प्लेसिसने ७२ धावा केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतियाने ३, आर्चर-गोपाळ आणि करन या जोडीने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने तेराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळताना २१६ धावांचा डोंगर उभा केला. संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानचा संघ वरचढ दिसत होता. परंतू सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. परंतू अखेरच्या षटकांत तळातल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानने २०० धावांचा टप्पा ओलांडला. सॅमसनने ३२ चेंडूत १ चौकार आणि ९ षटकारांसह ७४ धावा केल्या. स्मिथनेही ६९ धावा करत कर्णधारपदाची जबाबदारी निभावली.

नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पदार्पण करणाऱ्या मुंबईकर यशस्वी जैस्वालला स्वस्तात माघारी धाडत चेन्नईने चांगली सुरुवात केली. मात्र यानंतर मैदानावर आलेल्या संजू सॅमसनने स्टिव्ह स्मिथच्या साथीने चेन्नईच्या गोलंदाजीची धुलाई केली. दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत दोन्ही फलंदाजांनी राजस्थानला सुस्थितीत आणलं. सॅमसनने १९ चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं. विशेषकरुन पियुष चावलावर दोन्ही फलंदाजांनी हल्लाबोल केला. एन्गिडीने सॅमसनला बाद करुन राजस्थानची जोडी फोडली आणि राजस्थानच्या डावाला गळती लागली.

मधल्या फळीत डेव्हिड मिलर, रॉबिन उथप्पा, राहुल तेवतिया, रियान पराग हे फलंदाज झटपट माघारी परतले. अखेरच्या षटकांत स्टिव्ह स्मिथही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ६९ धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करनने ३, दीपक चहर-एन्गिडी आणि पियुष चावलाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

23:31 (IST)22 Sep 2020
धोनीची अखेरच्या षटकात फटकेबाजी

परंतू वेळ हातातून निघून गेली, १६ धावांनी राजस्थान रॉयल्स विजयी

23:20 (IST)22 Sep 2020
फाफ डु प्लेसिस माघारी

जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर सॅमसनकडे झेल देऊन परतला माघारी

७२ धावांची केली खेळी

23:12 (IST)22 Sep 2020
फाफ डु-प्लेसिसची एकाकी झुंज

राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत झळकावलं अर्धशतक

22:54 (IST)22 Sep 2020
जाधव - फाफ डु प्लेसिस जोडी करनने फोडली

बॅटची कड घेऊन उडालेला चेंडू यष्टीरक्षक सॅमसनने सुरेख झेल घेत टिपला

चेन्नईचा निम्मा संघ माघारी परतला

22:33 (IST)22 Sep 2020
पदार्पणाच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड अपयशी

राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळताना ऋतुराज यष्टीचीत

चेन्नई सुपरकिंग्जचा संघ अडचणीत

22:22 (IST)22 Sep 2020
चेन्नईला तिसरा धक्का, सॅम करन माघारी

राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळताना करन यष्टीचीत

22:16 (IST)22 Sep 2020
मुरली विजय माघारी, चेन्नईला दुसरा धक्का

२१ धावा काढून विजय माघारी, श्रेयस गोपाळने घेतला बळी

22:12 (IST)22 Sep 2020
चेन्नईला पहिला धक्का, वॉटसन माघारी

वॉटसनची २१ चेंडूत ३३ धावांची खेळी, १ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश

22:11 (IST)22 Sep 2020
शेन वॉटसन - मुरली विजय जोडीची चांगली सुरुवात

पॉवरप्ले षटकांमध्ये फटकेबाजी, पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी

21:23 (IST)22 Sep 2020
२० षटकांत राजस्थानची २१६ धावांपर्यंत मजल

चेन्नई सुपरकिंग्जला विजयासाठी २१७ धावांचं आव्हान

21:22 (IST)22 Sep 2020
२० षटकांत राजस्थानची २१६ धावांपर्यंत मजल

चेन्नईला विजयासाठी २१७ धावांचं आव्हान

21:20 (IST)22 Sep 2020
जोफ्रा आर्चरची फटकेबाजी

एन्डिगीचा अखेरच्या षटकात स्वैर मारा, राजस्थानने ओलांडला २०० चा टप्पा

21:08 (IST)22 Sep 2020
राजस्थानला सातवा धक्का, स्टिव्ह स्मिथ माघारी

सॅम करनच्या गोलंदाजीवर षटकार खेळण्याच्या प्रयत्नात स्मिथ माघारी

केदार जाधवने घेतला झेल, ४७ चेंडूत ६९ धावांची खेळी

20:58 (IST)22 Sep 2020
रियान परागही माघारी परतला, राजस्थानला सहावा धक्का

सॅम करनचे एकाच षटकांत दोन बळी

20:56 (IST)22 Sep 2020
राहुल तेवतिया माघारी, राजस्थानचा पाचवा गडी बाद

सॅम करनच्या गोलंदाजीवर तेवतिया माघारी

20:46 (IST)22 Sep 2020
राजस्थानचा चौथा गडी माघारी परतला

पियुष चावलाच्या गोलंदाजीवर रॉबिन उथप्पा माघारी, राजस्थानची धावगतीही मंदावली

20:33 (IST)22 Sep 2020
कर्णधार स्टिव्ह स्मिथचं अर्धशतक

सामन्यात अजुनही राजस्थान रॉयल्स वरचढ

20:31 (IST)22 Sep 2020
राजस्थानला तिसरा धक्का, डेव्हिड मिलर धावबाद

एन्गिडीच्या गोलंदाजीवर चोरटी दुहेरी धाव काढताना मिलर धावबाद, राजस्थानचा तिसरा गडी माघारी

20:30 (IST)22 Sep 2020
अखेरीस राजस्थानची जोडी फोडण्यास चेन्नईला यश

एन्गिडीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन माघारी

३२ चेंडूत सॅमसनच्या ७४ धावा, अर्धशतकी खेळीत एक चौकार आणि ९ षटकारांचा समावेश

20:20 (IST)22 Sep 2020
संजू सॅमसनची फटकेबाजी सुरुच

चेन्नईच्या गोलंदाजांवर चौफर हल्लाबोल, १० व्या षटकाच्या आतच राजस्थानने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा

20:10 (IST)22 Sep 2020
संजू सॅमसनकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई

चौफेर फटकेबाजी करुन १९ चेंडूत झळकावलं अर्धशतक

20:03 (IST)22 Sep 2020
स्मिथ - सॅमसन जोडीने सावरला राजस्थानचा डाव

दुसऱ्या विकेटसाठी राजस्थानची महत्वपूर्ण भागीदारी, ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

19:46 (IST)22 Sep 2020
राजस्थानला पहिला धक्का, यशस्वी जैस्वाल माघारी

दीपक चहरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जैस्वाल माघारी, पहिल्याच सामन्यात केल्या केवळ ६ धावा

19:17 (IST)22 Sep 2020
असा आहे चेन्नईचा अंतिम ११ जणांचा संघ

अंबाती रायुडूला संघात स्थान नाही...

19:14 (IST)22 Sep 2020
असा आहे राजस्थान रॉयल्सचा अंतिम संघ

मुंबईकर यशस्वी जैस्वालचं पदार्पण..

19:02 (IST)22 Sep 2020
महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संघात स्थान

18:44 (IST)22 Sep 2020
आयपीएलच्या सलामीच्या सामन्याला प्रेक्षकांची भरघोस पसंती
18:43 (IST)22 Sep 2020
यशस्वी जैस्वालवर असेल साऱ्यांचं लक्ष

U-19 क्रिकेट आणि स्थानिक स्पर्धेत यशस्वीची उल्लेखनीय कामगिरी

18:41 (IST)22 Sep 2020
सामन्याआधी स्टिव्ह स्मिथ सराव करत असताना
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : ‘विराट’सेनेची बाजी, परंतू उमेश यादवच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
2 विराटने घेतला शाहरुखशी पंगा?; फोटो होतोय व्हायरल…
3 IPL जगात भारी: पहिल्याच सामन्याने मोडले Viewership चे विक्रम, इतक्या कोटी लोकांनी पाहिला सामना
Just Now!
X