इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनने षटकारांचा पाऊस पाडला असं म्हटल्यासं चुकीचं ठरणार नाही. तुफान फटकेबाजी करणाऱ्या संजूने ३२ चेंडूमध्ये ७४ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झलकावण्याच्या विक्रमाशी बरोबरीही केली.

सामन्याच्या तिसऱ्या षटकामध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल माघारी परतल्यानंतर संजू फलंदाजीसाठी आला. जोस बटरलच्या अनुपस्थितीत संजूला संघात स्थान देण्यात आल्याने तिसऱ्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी आला. त्यानंतर पुढील आठ षटकांमध्ये संजू आणि स्टीव्ह स्मिथने तुफान फलंदाजी करत १०० धावांची पार्टनरशीप केली. संजूने अवघ्या १९ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं. संजूने चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रविंद्र जाडेजा आणि पियुष चावला यांच्या दोन षटकांमध्ये संजूने एकूण चार षटकार लगावले. आपल्या ७४ धावांच्या खेळीमध्ये संजूने ५४ धावा ९ षटकारांच्या मदतीने केल्या. ३२ चेंडूतील ७४ धावांपैकी ५८ धावा संजूने षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून काढल्या.

चेन्नईविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक करणारे खेळाडू

के. एल. राहुल : मोहाली (२०१९) १९ चेंडूंमध्ये अर्धशतक
संजू सॅमसन : शारजा (२०२०) १९ चेंडूंमध्ये अर्धशतक
डेव्हिड वॉर्नर : हैदराबाद (२०१५) २० चेंडूंमध्ये अर्धशतक

या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचे राजस्थान रॉयल्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या लढतीत पारडे जड मानले जात आहे. मात्र राजस्थानची फलंदाजी पाहता आता हा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.