आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफची शर्यत आता अधिक रंगतदार झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने शनिवारी खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ५९ धावांनी मात करत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं. कोलकात्याच्या या विजयामुळे हैदराबाद आणि पंजाब यांना चौथ्या स्थानावर येण्यासाठी आता अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. दिल्लीने आजचा सामना जिंकला असता तर हैदराबाद किंवा पंजाबसाठी ते फायदेशीर ठरणार होतं. परंतू त्यांच्यासमोरचं आव्हान आता खडतर होणार आहे. दरम्यान दुबईच्या मैदानावर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मयांक अग्रवालच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या मनदीप सिंह आणि लोकेश राहुल जोडीने पंजाबला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांमध्ये ३७ धावांची भागीदारी झाल्यानंतर संदीप शर्माने मनदीप सिंहला माघारी धाडत आयपीएलच्या इतिहासातला आपला १०० वा बळी घेतला. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय गोलंदाज ठरलाय.

गेल्या काही वर्षांपासून स्थानिक क्रिकेटसह आयपीएलमध्ये संदीप शर्माने आश्वासक गोलंदाजी केली आहे.

दरम्यान पंजाबने हैदराबादविरुद्ध सामन्यात १० षटकांत २ गडी गमावत ६६ धावांपर्यंत मजल मारली.