भारतीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय अशी IPL स्पर्धा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेच पाहतात. सर्वात श्रीमंत अशा स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. मात्र काही लोक अशा स्पर्धांचा वापर करून सट्टेबाजी करण्याचा प्रयत्न करतात. सध्या युएईमध्ये सुरू असलेल्या IPLच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या अशा सहा जणांना कर्नाटकात अटक करण्यात आल्याची माहिती पीटीआयने दिली. या सहा जणांना दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. त्याचसोबत त्यांच्याकडून सहा लाखांची रोकडही जप्त करण्यात आली.

IPLच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या या सहा जणांवर क्रेंद्रीय गुन्हे शाखेने कारवाई केली. बनासवाडी आणि मल्लेश्वरम या दोन ठिकाणांहून या सहा जणांना अटक करण्यात आल्याचे केंद्रीय गुन्हे शाखेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे या सहा जणांविरूद्ध एकूण दोन खटले दाखल करण्यात आले आहेत. सट्टेबाज प्रत्येक चेंडू, प्रत्येक षटक आणि संघांची हार-जीत यावर इतरांकडून सट्ट्यासाठी पैसे घेत होते. केंद्रीय गुन्हे शाखेला माहिती मिळताच त्यांनी या सहा जणांना अटक केली.