News Flash

IPL 2020 : CSK ची झुंज अपयशी, रंगतदार सामन्यात सनराईजर्स हैदराबादची बाजी

धोनी-जाडेजाची झुंज अपयशी, ७ धावांनी हैदराबादचा विजय

छायाचित्र सौजन्य - IPL/BCCI

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या खराब कामगिरीचं सत्र सुरुच आहे. दुबईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्जवर ७ धावांनी मात केली. तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवाची ही हॅटट्रीक ठरली आहे. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर चेन्नईला राजस्थान, दिल्ली आणि हैदराबाद या तीन संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी चेन्नईच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना संधीच दिली नाही. शेवटच्या षटकांत धोनी-जाडेजाने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली. परंतू अखेरीस चेन्नईचे हे प्रयत्न ७ धावांनी तोकडेच पडले. चेन्नईचा संघ १५७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

१६५ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शेन वॉटसन भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. यानंतर संघात पुनरागमन करणारा रायुडूही फारशी चमक दाखवू शकला नाही. टी. नटराजनने रायुडूचा त्रिफळा उडवला, तो फक्त ८ धावा करु शकला. यानंतर फॉर्मात असलेला फाफ डु-प्लेसिसही चोरटी धाव घेताना धावबाद झाला. अष्टपैलू केदार जाधवनेही अब्दुल समदच्या गोलंदाजीवर विकेट फेकत संघाला आणखीनच संकटात टाकलं. यानंतर मैदानावर आलेल्या रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

धोनी-जाडेजा जोडीने यानंतर संघाची पडझड थांबवली तरीही अपेक्षित धावगती कायम राखण्यात ते अपयशी ठरले. पाचव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी ७२ धावांची भागीदारी करत संघाचं आव्हान कायम राखलं. अखेरच्या षटकांत जाडेजाने फटकेबाजी करत आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. परंतू नटराजनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो ५० धावांची खेळी करुन माघारी परतला. यानंतर धोनीने फटकेबाजी करत धावा जमवण्याचा प्रयत्न केला, परंतू दुबईच्या उष्ण वातावरणात धावा काढताना धोनीलाही थकायला झालं होतं. तरीही अखेरच्या षटकांत धोनीने संघाला विजयासाठी २८ धावांच्या आव्हानापर्यंत आणून ठेवलं. भुवनेश्वर कुमारं १९ वं षटक टाकताना दुखापतग्रस्त झाल्यामुळे हैदराबादकडून अखेरचं षटक अब्दुल समदने टाकलं. समोर धोनीसारखा फलंदाज असतानाही समदने आश्वासक कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. हैदराबादकडून टी.नटराजनने २, भुवनेश्वर कुमारने १ तर अब्दुल समादने १ बळी घेतला.

त्याआधी, सलग दोन सामन्यांत पराभव स्वीकारल्यानंतर टीकेचं धनी झालेल्या चेन्नई सुपरकिंग्जने आश्वासक खेळ केला. सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात चेन्नईने टिच्चून मारा करत हैदराबादला १६४ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करत हैदराबादच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. वॉर्नर-बेअरस्टो-पांडे, विल्यमसन हे हैदराबादचे महत्वाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे संघ महत्वाच्या षटकांत धावा करु शकला नाही. परंतू प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या युवा फलंदाजांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. हैदराबादकडून प्रियम गर्गने नाबाद ५१ धावा केल्या.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जॉनी बेअरस्टो दीपक चहरच्या भन्नाट इनस्विंगवर क्लिन बोल्ड होऊन माघारी परतला. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानावर स्थिरावतेय असं वाटत असतानाच मराठमोळ्या शार्दुल ठाकूरने मनिष पांडेला माघारी धाडलं. पांडेने २९ धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने डेव्हिड वॉर्नरही मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. सीमारेषेवर फाफ डु-प्लेसिसने वॉर्नरचा सुरेख झेल घेतला. वॉर्नरने २८ धावा केल्या.

चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडपासून हैदराबादच्या फलंदाजांवर अंकुश लावला होता. ज्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये हैदराबादच्या फलंदाजांवर दडपण आलं. केन विल्यमसनही प्रियम गर्गसोबत एकेरी धाव घेताना धावबाद झाला. महत्वाचे सर्व फलंदाज माघारी परतल्यानंतर अभिषेक वर्मा आणि प्रियम गर्ग जोडीने जबाबदारी आपल्या अंगावर घेत फटकेबाजीला सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अखेरच्या षटकात दीपक चहरने अभिषेक शर्माला माघारी धाडत हैदराबादला आणखी एक धक्का दिला. मात्र प्रियम गर्गने अखेरपर्यंत किल्ला लढवत आपलं अर्धशतक साजरं केलं. चेन्नईकडून दीपक चहरने २ तर शार्दुल ठाकूर आणि पियुष चावलाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 9:15 pm

Web Title: ipl 2020 srh beat csk by 7 runs ms dhoni cameo goes in vain psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 Video : भन्नाट इनस्विंगवर बेअरस्टोची दांडी गूल, दीपक चहरची धडाकेबाज सुरुवात
2 IPL 2020 : नाणेफेक जिंकून हैदराबादची फलंदाजी, CSK मध्ये रायुडू-ब्राव्होला स्थान
3 IPL 2020 : धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा, जवळच्या मित्राचा विक्रम मोडला
Just Now!
X