News Flash

IPL 2020 : हैदराबादला विजयी सूर गवसला, पंजाबकडून निकोलस पूरनची एकाकी झुंज

राशिद खानचा प्रभावी मारा

फोटो सौजन्य - IPL/BCCI

आयपीएलच्या तेराव्या हंगामात पंजाबच्या संघाची खराब कामगिरी सुरुच आहे. दुबईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने पंजाबवर ६९ धावांनी मात करत आपली गाडी पुन्हा एकदा विजयी मार्गावर आणली आहे. २०२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पंजाबचा संघ १३२ धावांपर्यंतच मजल मारु शकला. पंजाबकडून निकोलस पूरनने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ न लाभल्यामुळे पंजाबला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला.

डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल चोरटी धाव घेताना लोकेश राहुलसोबत झालेल्या गोंधळात धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर प्रबसिमरन सिंह आणि कर्णधार लोकेश राहुलही ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मैदानात आलेल्या निकोलस पूरनने ग्लेन मॅक्सवेलसोबत महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान पूरनने फटकेबाजी करत आपलं अर्धशतकही साजरं केलं. दोन्ही फलंदाजांमध्ये ४७ धावांची भागीदारी झाल्यानंतर प्रियम गर्गच्या अचूक फेकीवर मॅक्सवेल धावबाद होऊन माघारी परतला.

यानंतर पंजाबच्या डावाला पुन्हा एकदा गळती लागली. एकही फलंदाज हैदराबादच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. एवढा वेळ मैदानावर तग धरुन असलेला निकोलस पूरनही राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली. यानंतर पंजाबच्या तळातल्या फलंदाजांनी मैदानावर येण्याची औपचारिकता पूर्ण केली आणि हैदराबादचा विजय सोपा केला. हैदराबादकडून राशिद खानने ३, खलिल अहमद आणि टी. नटराजनने प्रत्येकी २ तर अभिषेक शर्मा १ बळी घेतला.

त्याआधी, कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर सनराईजर्स हैदराबादने पंजाबविरुद्ध सामन्यात २०१ धावांचा डोंगर उभा केला आहे. पहिल्या विकेटसाठी वॉर्नर-बेअरस्टो जोडीने १६० धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज मैदानात असताना हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. परंतू रवी बिश्नोईने ही जोडी फोडत पंजाबला मोठं यश मिळवून दिलं. मधल्या षटकांत पंजाबच्या गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं. हैदराबादकडून वॉर्नरने ५२ तर जॉनी बेअरस्टोने ९७ धावा केल्या.

नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो जोडीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नर आणि बेअरस्टो जोडीने पहिल्यापासूनच आश्वासक खेळ करत पंजाबवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. सुरुवातीची काही षटकं नीट खेळून काढल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करायला सुरुवात केली. हैदराबादची ही जोडी फोडणं पंजाबच्या गोलंदाजांना काही केल्या जमतं नव्हतं. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना आपापलं अर्धशतक पूर्ण केलं. दोन्ही फलंदाज करत असलेली फटकेबाजी पाहता हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभी करणार असं वाटत असतानाच रवी बिश्नोईने डेव्हिड वॉर्नरला ५२ धावांवर माघारी धाडत हैदराबादला पहिला धक्का दिला. वॉर्नरने ४० चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावा केल्या.

बेअरस्टो आणि वॉर्नर जोडीने पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली. दुसरीकडे फॉर्मात असलेला जॉनी बेअरस्टो शतकाच्या उंबरठ्यावर असताना रवी बिश्नोईने पंजाबला आणखी एक यश मिळवून दिलं. ९७ धावांवर असताना बेअरस्टो पायचीत होऊन माघारी परतला. त्याने आपल्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीत ७ चौकार आणि ६ षटकार लगावले. यानंतर मैदानात आलेला मनिष पांडेही अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीवर एक धाव काढून माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या अब्दुल समद आणि केन विल्यमसन जोडीने फटकेबाजी करत धावा जमवण्याचा प्रयत्न केला. परंतू रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर समदही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. प्रियम गर्गही अर्शदीपच्या गोलंदाजीवर भोपळा न फोडता बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन जोडीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत हैदराबादला अधिकाधिक धावा जमवून दिल्या. पंजाबकडून रवी बिश्नोईने ३, अर्शदीप सिंहने २ तर मोहम्मद शमीने १ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 9:30 pm

Web Title: ipl 2020 srh beat kxip by 69 runs bowlers shines psd 91
Next Stories
1 IPL 2020 : ….जेव्हा पंजाबचा संघ आपल्याच गोलंदाजांना ट्रोल करतो
2 IPL 2020 : जोडी तुझी-माझी! वॉर्नर-बेअरस्टो जोडीचा नवा विक्रम
3 IPL 2020 : प्रत्येक गोष्टीसाठी धोनीला दोष देता येणार नाही !
Just Now!
X