News Flash

IPL 2020 : पांडे-शंकर जोडीची संयमी भागीदारी, हैदराबादची राजस्थानवर मात

राजस्थानचं स्पर्धेतलं आव्हान अधिक खडतर

सुरुवातीच्या षटकांमध्ये जोफ्रा आर्चरने दिलेल्या दणक्यांमधून सावरत मनिष पांडे आणि विजय शंकर या जोडीने केलेल्या संयमी भागीदारीच्या जोरावर सनराईजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ८ गडी राखून मात केली आहे. विजयासाठी हैदराबादला १५५ धावांचं आव्हान मिळालं होतं. परंतू या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नर आणि बेअरस्टो जोडी स्वस्तात माघारी परतली होती. परंतू यानंतर मनिष पांडे आणि विजय शंकर यांनी सावध खेळ करत अधिक पडझड न होऊ देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीनंतर हैदराबादचे फलंदाज राजस्थानने विजयासाठी दिलेलं आव्हान सहज पूर्ण करतील अशी आशा होती. परंतू जोफ्रा आर्चरने सुरुवातीच्या षटकातच कर्णधार वॉर्नरला माघारी धाडलं. यानंतर जॉनी बेअरस्टोही त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. वॉर्नर ४ तर बेअरस्टो १० धावा काढून माघारी परतला. मात्र यानंतर मनिष पांडेने संयमी खेळ करत संघाचा डाव सावरला. मैदानावर स्थिरावल्यानंतर फटकेबाजी करत मनिषने धावांची गती कायम राहील याची काळजी घेतली. महत्वाची गोष्ट म्हणजे विजय शंकरनेही दुसऱ्या बाजूने मनिष पांडेला उत्तम साथ देत हैदराबादचं आव्हान कायम राखलं. राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतू त्याला यात अपयश आलं. मनिष पांडेने नाबाद ८३ तर विजय शंकरने नाबाद ५२ धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरचा अपवाद वगळता एकही गोलंदाज यशस्वी होऊ शकले नाहीत.

त्याआधी, मोक्याच्या क्षणी गोलंदाजांनी केलेला टिच्चून मारा आणि राजस्थानच्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीच्या जोरावर हैदराबादने राजस्थान रॉयलची घौडदौड १५४ धावांपर्यंत रोखली आहे. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या शिलेदारांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत राजस्थानच्या फलंदाजांना मोक्याच्या क्षणी धक्के देत पहिल्या डावात आपलं वर्चस्व कायम राखलं.

नाणेफेक जिंकून सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्स ही जोडी मैदानावर स्थिरावतेय असं वाटत असतानाच उथप्पा एकेरी धाव घेताना धावबाद झाला. यानंतर संजू सॅमसन आणि स्टोक्स यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत धावा जमवण्याकडे आपला भर दिला. गेल्या काही सामन्यांपासून फॉर्म गमावून बसलेला संजू सॅमसन या सामन्यात चांगलाच रंगात आला होता. जेसन होल्डरने सॅमसनला त्रिफळाचीत करुन हैदराबादला दुसरं यश मिळवून दिलं. यानंतर लागोपाठ बेन स्टोक्सही राशिद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.

मोक्याच्या क्षणी राजस्थानचे दोन फलंदाज माघारी परतल्यामुळे संघ पुन्हा एकदा बॅकफूटवर फेकला गेला. जोस बटवर आणि स्टिव्ह स्मिथ जोडीकडून राजस्थानला अपेक्षा होत्या…परंतू विजय शंकरच्या गोलंदाजीवर बटलर नदीमकडे झेल देत माघारी परतला. फटकेबाजीच्या करण्याच्या षटकांमध्ये राजस्थानचे नवीन फलंदाज मैदानात असल्यामुळे धावगतीवर अंकुश बसला. रियान परागने फटकेबाजी करत धावा जमवण्याचा प्रयत्न केला. परंतू दुसऱ्या बाजूने स्टिव्ह स्मिथ धावा जमवण्याच्या प्रयत्नात मोठा फटका खेळताना सीमारेषेवर मनिष पांडेकडे झेल देऊन माघारी परतला. जेसन होल्डरने त्याच षटकात रियान परागला माघारी धाडत राजस्थानला आणखी एक धक्का दिला. हैदराबादकडून जेसन होल्डरने ३, विजय शंकर आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 9:14 pm

Web Title: ipl 2020 srh beat rr by 8 wickets manish pandey and vijay shankar shines psd 91
Next Stories
1 IPL 2020 : अखेरच्या स्थानावर फेकल्या गेलेल्या पंजाबची जोरदार मुसंडी, जाणून घ्या नेमका काय झाला बदल??
2 Video : टांगा पल्टी घोडे फरार ! काही कळायच्या आतच सिराजकडून नितीश राणाची दांडी गुल
3 IPL 2020 : RCB विरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर फलंदाजांवर भडकला ब्रँडन मॅक्युलम
Just Now!
X