स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी विजयाच्या शोधात दुबईच्या मैदानावर उतरलेल्या सनराईजर्स हैदराबाद संघाने आश्वासक सुरुवात केली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत हैदराबादच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. वॉर्नर आणि बेअरस्टो जोडीने यादरम्यान आयपीएलमध्ये १ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारी वॉर्नर-बेअरस्टो ही सातवी जोडी ठरली आहे.

हैदराबादचा कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची किंग्ज इलेव्हन पंजाबविरोधात कामगिरी ही नेहमी चांगली राहिलेली आहे. त्यामुळे आपल्या या लौकिकाला साजेसा खेळ करतच वॉर्नरने बेअरस्टोच्या साथीने संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या पंजाबने हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी संघात ३ बदल केले परंतू सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेण्यात ते अपयशी ठरले.