आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आठवडाभरापूर्वी युएईत सुरुवात झाली. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ हा पहिल्यांदा गोलंदाजी करण्याकडे आपला भर देत होता. परंतू सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने तेराव्या हंगामातली ही परंपरा मोडली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून वॉर्नरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणारा वॉर्नर पहिला कर्णधार ठरला आहे.

यंदाचे सर्व सामने हे युएईत होणार असल्यामुळे आतापर्यंत सर्व संघ दवाचं कारण देऊन पहिल्यांदा गोलंदाजी करत होते. परंतू गेल्या काही सामन्यांत ही रणनिती काम करताना दिसत नाहीये. त्यामुळे वॉर्नरने धाडसी पाऊल टाकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध पहिल्या सामन्यात हैदराबादला हातात आलेला सामना गमवावा लागला होता. त्यामुळे या सामन्यासाठी वॉर्नरने संघात ३ बदल केले असून मोहम्मद नबी, खलिल अहमद आणि वृद्धीमान साहा यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.