१९ सप्टेंबरपासून पुढचे किमान दोन महिने भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी चांगले जाणार आहेत. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात होणार असून गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. करोनामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाची स्पर्धा युएईत आयोजित केली आहे. याआधीही २०१४ साली आयपीएलचे काही सामने युएईत आयोजित केले होते. त्यामुळे यंदा कोणत्या संघाला आहे विजयाची संधी?? कोणाचं पारडं असेल जड?? अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहूयात आयपीएलची आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते…

१) आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरलेला RCB संघ, स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या करणारा मानकरी आहे…आणि ते देखील एकदा नव्हे दोनवेळा RCB ने अशी कामगिरी करुन दाखवली आहे. २०१३ साली पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध २६३ तर २०१६ साली गुजरात संघाविरुद्ध २४८ धावा RCB ने केल्या होत्या. सर्वोच्च धावसंख्या उभारण्याच्या निकषांत चेन्नईचा संघ तिसऱ्या स्थानी येतो. २०१० साली चेन्नईने राजस्थानविरोधात २४६ धावा केल्या होत्या.

२) आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या इतिहासात सर्वात निच्चांकी धावसंख्येवर बाद होण्याचा नकोसा विक्रमही RCB च्याच नावावर जमा आहे. २०१७ साली कोलकाता नाईट रायडर्स संघाने RCB चा संघ ४९ धावांवर गुंडाळला होता.

३) २०१७ च्या हंगामात मुंबईने दिल्लीवर केलेली १४६ धावांनी मात ही आयपीएलच्या इतिहासात धावांच्या निकषात सर्वात मोठी मात आहे. दुसऱ्या स्थानी RCB चा संघ असून तिसरं स्थान कोलकाता संघाने पटकावलं आहे.

४) आतापर्यंत ८ सामन्यांचा निकाल हा सुपरओव्हवर लागलेला असून कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ३ वेळा यात सहभागी होता. राजस्थान रॉयल्सने दोनवेळा सुपर ओव्हरवर सामना जिंकलेला आहे.

५) एका सामन्यात सर्वाधिक अवांतर धावा देण्याचा नकोसा विक्रम कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नावावर आहे. २००८ साली डेक्कन चार्जर्सविरोधात कोलकाताच्या गोलंदाजांनी २८ अवांतर धावा दिल्या होत्या.

६) RCB चा कर्णधार विराट कोहली हा आयपीएलच्या इतिहासातला सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. त्याच्या नावावर ५ हजार ४१२ धावा जमा आहेत. दुसऱ्या स्थानी सुरेश रैना असून त्याच्या नावावर ५ हजार ३६८ धावा जमा आहेत. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या नावावर ४ हजार ८९८ धावा जमा आहेत.

७) स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम हा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ३२६ षटकार ठोकले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे एकही फलंदाज सध्या गेलच्या शर्यतीत नाहीयेत.

८) आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रमही गेलच्याच नावावर जमा आहेत. २०१३ पुणे संघाविरोधात केलेल्या १७५ धावा ही आयपीएलमधली सर्वोच्च धावसंख्या आहे. यंदाच्या हंगामात गेल किंग्ज इलेव्हन पंजाबचं नेतृत्व करतोय.

९) आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रमही गेलच्याच नावावर जमा आहे. त्याने आतापर्यंत ६ शतकं झळकावली असून विराट कोहली ५ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

१०) लोकेश राहुलने १४ चेंडूत झळकावलेल्या ५१ धावा हे आयपीएलमधलं सर्वात जलद अर्धशतक मानलं जातं.

११) १७० बळींसह लसिथ मलिंगा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. यंदा खासगी कारणामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.

१२) ३.४ षटकांत १२ धावा देऊन ६ बळी ही आतापर्यंत आयपीएलमधली गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मुंबई इंडियन्सच्या अल्झारी जोसेफने गेल्या हंगामात सनराईजर्स हैदराबादविरुद्ध ही कामगिरी केली होती.

१३) आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅटट्रीक घेण्याचा विक्रम हा दिल्लीच्या अमित मिश्राच्या नावावर आहे. अनुभवी अमित मिश्राने आतापर्यंत ३ वेळा हॅटट्रिक घेतली आहे.

१४) सर्वाधिकवेळा ४ बळी घेण्याचा विक्रम हा कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरीनच्या नावावर आहे.

१५) आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम हा प्रवीण कुमारच्या नावावर जमा आहे. त्याने आतापर्यंत ११९ सामन्यांत १४ निर्धाव षटकं टाकली आहेत.