इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

सनरायजर्स हैदराबादला मंगळवारच्या लढतीत नमवून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाद फेरीमधील स्थान पक्के करण्याचा निर्धार दिल्ली कॅपिटल्सने केला आहे.

कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांकडून लागोपाठच्या सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यामुळे दिल्लीच्या विजयी प्रवासाला धक्का बसला आहे. परंतु गुणतालिकेत आणखी दोन गुणांची भर घातल्यावर १६ गुणांनिशी ते अग्रस्थानासह बाद फेरीमधील स्थान निश्चित करू शकतात. सनरायजर्स हैदराबादचे बाद फेरीचे भवितव्य मात्र अधांतरी आहे. ११ सामन्यांद्वारे फक्त आठ गुण कमावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. बाद फेरीस पात्र होण्यासाठी त्यांना उर्वरित तिन्ही सामन्यांमधील विजयांसह अन्य निकालांचीही प्रतीक्षा करावी लागेल.

दिल्लीकडे स्फोटक फलंदाजांची फळी आहे, तसेच त्यांचा गोलंदाजीचा माराही समतोल आहे. कोणत्याही एका खेळाडूवर हा संघ विसंबून नाही. अनेक खेळाडूंनी आपली कामगिरी मोक्याच्या क्षणी उंचावल्याने दिल्लीचा संघ सामथ्र्यवान असल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु मागील तीन सामन्यांत शिखर धवन वगळता दिल्लीच्या अन्य फलंदाजांना सातत्य राखण्यात अपयश आले होते. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात धवनने शतकी खेळी साकारली होती. धवनने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धही शतक झळकावले होते. परंतु अन्य फलंदाजांकडून पुरेशी साथ न मिळाल्याने दिल्लीने सामना गमावला होता. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १९४ धावांचे लक्ष्य पेलताना दडपणाखाली दिल्लीला ९ बाद १३५ धावाच करता आल्या होत्या.

सलामीवीर पृथ्वी शॉ अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरू लागल्याने कोलकाताविरुद्ध अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली. परंतु रहाणेला भोपळाही फोडता आला नाही. ऋषभ पंत आणि शिम्रॉन हेटमायर पुनरागमनानंतर धावांसाठी झगडताना आढळत आहेत.

कॅगिसो रबाडा (२३ बळी) आणि आनरिख नॉर्किए (१४ बळी) हे दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज टिच्चून गोलंदाजी करीत आहे. याशिवाय तुषार देशपांडे, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल असे वैविध्यपूर्ण गोलंदाज दिल्लीच्या ताफ्यात आहेत.

दुसरीकडे, हैदराबादचा संघ पंजाबकडून पत्करलेल्या मानहानीकारक पराभवानंतर सावरण्यासाठी प्रयत्नशील आहे. १२७ धावांचे माफक लक्ष्य साधता सलामीवीर वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो बाद झाल्यानंतर हैदराबादचा डाव ११४ धावांत कोसळला. या संघाने अखेरच्या दोन षटकांत पाच फलंदाजांना गमावले. बेअरस्टो, वॉर्नर आणि मनीष पांडे यांच्यावर हैदराबादच्या फलंदाजीची प्रमुख धुरा आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या विजयात विजय शंकरने चमकदार कामगिरी केली होती. परंतु पंजाबविरुद्ध तो अपयशी ठरला. जेसन होल्डरच्या समावेशामुळे हैदराबादच्या गोलंदाजीचा मारा मजबूत झाला आहे. यंदाच्या हंगामात हैदराबादने दिल्लीला नमवले आहे, हेच त्यांच्यासाठी आत्मविश्वास उंचावणारे ठरेल.

*  सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या