३० वर्षीय सूर्यकुमार यादवला अद्यापही भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. सातत्याने चांगली कामगिरी करूनही निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे मत अनेक दिग्गजांनी व्यक्त केले आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन-डे संघात सूर्यकुमारला संधी मिळेल असं वाटत होतं. परंतू तिकडेही त्याच्या पदरी निराशाच आली. आरसीबीविरोधात गुरुवारी झालेल्या सामन्यात ७९ धावांची नाबाद खेळी करत सुर्यकुमार यादवनं मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला. सूर्यकुमारची ही अर्धशतकी खेळी, BCCI च्या निवड समितीसाठी एक चपराक मानली जात आहे. सामन्यानंतर बोलताना पोलार्डनं सुर्यकुमार यादवच्या मनातील गोष्ट बोलून दाखवली.

सुर्यकुमार यादवची अद्याप भारतीय संघात निवड न झाल्यामुळे मुंबई संघाचा सध्याचा कर्णधार कायरन पोलार्डनेही आश्चर्य व्यक्त केलं आहे. सामन्यानंतर बोलताना पोलार्ड म्हणाला की, भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सुर्यकुमार यादव नक्कीच दु:खी असेल. देशांतर्गत, आयपीएल आणि भारतीय अ संघाकडून शानदार प्रदर्शन केल्यानंतरही सुर्यकुमारची भारतीय संघात निवड झाली नाही.

सूर्यकुमार यादवने बुधावरी केलेल्या नाबाद ७९ धावांच्या खेळीचंही पोलार्डनं यावेळी कौतुक केलं. सुर्यकुमार संघासाठी सातत्यानं धावा जमवतोय. लवकरच सुर्यकुमारची भारतीय संघात निवड होईल. आम्ही सुरुवातीला काही विकेट लवकर गमावल्या. पण सुर्यकुमार यादवने विजय मिळवून दिला. तुम्ही सतत चांगलं प्रदर्शन करत असाल तर तुम्हाला बक्षीस मिळायला हवं. मात्र, सुर्यकुमारची भारतीय संघात निवड झाली नाही. निवड न झाल्यामुळे सुर्यकुमार यादव दु:खी असेल.

सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या १३ व्या हंगामातील १२ सामन्यात ४०.२२ च्या सरासरीने ३६२ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्स कडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सलामीवीर क्विंटन डिकॉकनंतर दुसऱ्या स्थानी आहे.