आयपीएलच्या तेराव्या हंगामात गुणतालिकेत तळाशी असणारा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आज विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना करणार आहे. यंदा लागोपाठ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे पंजाबच्या संघाची अवस्था दयनीय झाली आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ स्पर्धेत आश्वासक कामगिरी करतो आहे. स्पर्धेत याआधी पंजाब आणि बंगळुरु यांच्यात सामना रंगला, ज्यात कर्णधार विराट कोहलीने लोकेश राहुलच्या दोन सोप्या कॅच सोडल्या.

आपल्याला मिळालेल्या या जिवदानाचा फायदा घेत लोकेश राहुलने शतकी खेळी केली. पंजाबने या सामन्यात RCB वर ९७ धावांनी मात केली. मात्र यानंतर विराट कोहलीच्या RCB ने दमदार पुनरागमन करत प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखलं आहे, पण पंजाबच्या संघाची मात्र चांगलीच घसरण झालेली दिसते. RCB विरुद्ध सामन्याआधी राहुलने विराटला आधीच्या सामन्यात सोडलेल्या दोन सोप्या कॅचची आठवण करुन दिली. “RCB विरुद्ध खेळताना मी नेहमी उत्सुक असतो. याआधीच्या सामन्यात आम्ही जिंकलो आहेत त्यामुळे आमचा आत्मविश्वास थोडा दुणावलेला आहे. फक्त RCB च्या खेळाडूंनी मागच्या सामन्यासारख्या काही सोप्या कॅच सोडायला हव्यात.” एका खासगी ब्रँडच्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये राहुल आणि विराट बोलत होते.

अवश्य वाचा – IPL 2020 : विराट कोहलीची अजब मागणी, कर्णधारांना वाईड बॉलसाठी DRS चा पर्याय हवा!

विराट कोहलीनेही लोकेश राहुलला तितकंच दमदार प्रत्युत्तर दिलं आहे. “मागच्या सामन्यात कॅच सुटल्या असल्या तरीही मी माझ्या फिल्डींगची जागा बदलणार नाहीये. त्यामुळे हवेत मोठे फटके खेळताना तू दोनदा विचार कर.” विराटच्या नेतृत्वाखाली RCB च्या संघाने यंदा आश्वासक कामगिरी केली आहे. त्यामुळे पंजाबविरुद्ध सामन्यात हा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.