इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

डोनाल्ड ट्रम्प यांना शह देऊन जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली, हे ताजे असतानाच बिहारमधील सत्तेवर कोण वर्चस्व प्रस्थापित करणार हे मंगळवारी स्पष्ट होईल. निवडणुकांच्या या धामधुमीत दुबईतील क्रिकेटच्या रणांगणावर मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) निकालाची उत्कं ठाही शिगेला पोहोचली आहे. पाचव्यांदा जेतेपदासाठी दावेदारी करणाऱ्या मुंबई इंडियन्सपुढे प्रथमच जेतेपद जिंकू इच्छिणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असेल.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशांतर्गत क्रीडा क्षेत्र ठप्प असताना यंदा संयुक्त अरब अमिरातीत ‘आयपीएल’चे आयोजन करण्यात आले. १९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मनोरंजनाच्या पर्वणीचा गेले ५२ दिवस अपेक्षेहून अधिक चाहत्यांनी मनसोक्त आनंद लुटला. त्यामुळे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात कोणताही संघ जिंकला तरी रसिकांचे क्रिकेटकडे पुन्हा लक्ष वेधून घेण्यात ही लस नक्कीच यशस्वी ठरली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने साखळी फेरीदरम्यान गुणतालिकेत अग्रस्थान मिळवून बाद फेरी गाठली. त्यानंतर ‘क्वालिफायर-१’मध्ये दिल्लीलाच सहज धूळ चारून त्यांनी गतविजेत्यांच्या थाटात अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली खेळणाऱ्या नव्या दमाच्या दिल्लीला साखळी फेरीच्या उत्तरार्धात संघर्ष करावा लागला असला तरी रविवारी झालेल्या ‘क्वालिफायर-२’मध्ये बलाढय़ सनरायजर्स हैदराबादवर सरशी साधून त्यांनी प्रथमच अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.

मुंबईची फलंदाजी बळकट

सलग दुसऱ्या जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या मुंबईची फलंदाजांची फळी स्पर्धेत सर्वोत्तम मानली जाते. रोहितव्यतिरिक्त क्विंटन डीकॉक (४८३ धावा), सूर्यकुमार यादव (४६१), इशान किशन (४८३) यांच्यामुळे मुंबईची मधली फळी भक्कम असून हार्दिक पंडय़ा, किरॉन पोलार्ड अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यात वाकबगार आहेत. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यासाठी दिल्लीच्या गोलंदाजांना फार परिश्रम घ्यावे लागतील.

बुमरा-बोल्टपासून सावधान

जसप्रीत बुमरा (२७ बळी) आणि ट्रेंट बोल्ट (२२) या वेगवान जोडीपासून दिल्लीला पुन्हा सावध राहावे लागणार आहे. हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या बुमराचे ‘पर्पल कॅप’कडेही लक्ष असेल. त्याशिवाय फिरकीपटू राहुल चहर (१५) मधल्या षटकांत धावा रोखण्यात पटाईत आहे.

धवन, स्टोइनिसवर दिल्लीची मदार

हंगामात दोन शतके झळकावणारा सलामीवीर शिखर धवन (६०३ धावा) आणि अष्टपैलू मार्कस स्टोइनिस (३५२ आणि १२ बळी) यांच्यावर दिल्लीची प्रामुख्याने भिस्त आहे. कर्णधार अय्यर (४५४) फलंदाजीतही छाप पाडत असून क्षेत्ररक्षणातील त्याची व्यूहरचना यशस्वी ठरत आहे. ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे यांनीही अंतिम फेरीत योगदान दिल्यास दिल्लीला रोखणे मुंबईसाठी कठीण जाईल.

वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा मारा

‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत अग्रस्थानी असणारा कॅगिसो रबाडा (२९ बळी) आणि आनरिख नॉर्किए (२०) या दक्षिण आफ्रिकेच्या जोडीने दिल्लीच्या प्रत्येक विजयात मोलाची भूमिका बजावली असून त्यांना फिरकी विभागात रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांची साथ लाभत आहे. परंतु मुंबईच्या संघात डावखुऱ्या फलंदाजांचा भरणा असल्यामुळे प्रवीण दुबे किंवा अक्षरपैकी एकालाच अंतिम सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

दुबईच्या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण गेले असून येथेच सर्वाधिक झेलही सुटलेले पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सर्वोत्तम कामगिरी

* मुंबई : जेतेपद – २०१३, २०१५, २०१७, २०१९

* दिल्ली : बाद फेरी – २००८, २००९, २०१२, २०१९

आमनेसामने २७

मुंबई १५ – दिल्ली १२

यंदाच्या हंगामातील कामगिरी

* साखळी फेरी (११ ऑक्टोबर) – मुंबई पाच गडी राखून विजयी

* साखळी फेरी (३१ ऑक्टोबर) – मुंबई नऊ गडी राखून विजयी

* ‘क्वालिफायर-१’ (५ नोव्हेंबर) – मुंबई ५७ धावांनी विजयी

आकडेवारी

२ आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज या एकमेव संघालाच सलग दोन वर्षे (२०१०, २०११) ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवता आले आहे.

८ ‘आयपीएल’च्या अंतिम फेरीत आठ वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.

जेव्हा एखाद्या संघात एकापेक्षा एक विजयवीर असतात, तेव्हा कर्णधाराला फारसे काही सांगण्याची गरज लागत नाही. संपूर्ण स्पर्धेत परिस्थितीनुसार एखाद्या खेळाडूने जबाबदारी घेतली असून संघाला विजयीरेषा ओलांडून दिली आहे. त्यामुळे अंतिम फेरीतही आम्ही आतापर्यंत ज्याप्रमाणे खेळ केला, तसाच अंतिम फेरीतही करू.

– रोहित शर्मा, मुंबईचा कर्णधार

‘आयपीएल’च्या अंतिम फेरीत खेळणे, हाच माझ्यासह दिल्लीच्या सर्व खेळाडूंसाठी अभिमानाचा क्षण असणार आहे. संपूर्ण हंगामादरम्यान आम्ही सकारात्मक खेळ करण्यावर भर दिल्यामुळेच इथवर मजल मारली आहे. आता मुंबईविरुद्ध आमचा सर्वोत्तम खेळ करून जेतेपदाच्या करंडकासह भारतात परतण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

– श्रेयस अय्यर, दिल्लीचा कर्णधार

संभाव्य संघ

* मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, इशान किशन, कृणाल पंडय़ा, हार्दिक पंडय़ा, किरॉन पोलार्ड, नॅथन कुल्टर नाइल, जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर.

* दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, मार्कस स्टोयनिस, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), शिम्रॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, तुषार देशपांडे, कॅगिसो रबाडा, आनरिख नार्किए.

* स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

* सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ (संबंधित एचडी वहिन्यांवर)