श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत आश्वासक कामगिरी करत आला आहे. दुबईच्या मैदानावर दिल्लीने राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी मात केली. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. मात्र दिल्लीच्या विजयात कल्याण आणि डोंबिवलीच्या खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली आहे. होय, हे खेळाडू आहेत कल्याणचा तुषार देशपांडे आणि लहानपणी डोंबिवलीचा रहिवासी असलेला अजिंक्य रहाणे.

राजस्थानविरुद्ध सामन्यात दिल्लीने हर्षल पटेलला विश्रांती देत मराठमोळ्या तुषार देशपांडेला संधी दिली. तुषारनेही आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत दोन महत्वाचे बळी टिपले. बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांची जोडी मैदानावर स्थिरावत असताना शिखर धवनने तुषारला गोलंदाजी सोपवली आणि तुषारने बेन स्टोक्सला जाळ्यात अडकवलं. पाहा हा व्हिडीओ….

यानंतर अखेरच्या षटकांत राजस्थानला विजयासाठी २२ धावांची आवश्यकता असताना, राहुल तेवतियासारखा फलंदाज समोर असतानाही तुषारने सुंदर यॉर्कर चेंडूंचा मारा करत राजस्थानच्या धावांवर अंकुश लावला. पहिल्या चेंडूवर तेवतियाने मारलेला षटकार अडवत अजिंक्यनेही संघासाठी पाच धावा वाचवल्या. फलंदाजीत अजिंक्यला आपली भूमिका निट बजावता आली नसली तरीही क्षेत्ररक्षणात त्याने आपली भूमिका चोख बजावली.

दिल्लीकडून नॉर्ज आणि तुषार देशपांडेंने प्रत्येकी दोन बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. याआधी फलंदाजीत शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी करत संघाला १६१ धावांचा टप्पा गाठून दिला.