इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये गुरुवारी होणाऱ्या राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स यांच्यातील लढतीत दोन्ही संघांसाठी विजय अत्यावश्यक आहे. अनुभवी खेळाडू अपयशी ठरल्यास हैदराबादकडून प्रियम गर्ग आणि अब्दुल समद तर राजस्थानकडून कार्तिक त्यागी आणि रियान पराग या युवा खेळाडूंवर दडपण हाताळून कामगिरी उंचावण्याची जबाबदारी असेल.

‘आयपीएल’ गुणतालिकेत हैदराबादचा संघ नऊ सामन्यांत सहा गुण मिळवून सातव्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मागील सामन्यात दमदार विजय मिळवणारा राजस्थानचा संघ १० सामन्यांत आठ गुण मिळवून सहाव्या स्थानावर आहे. पाच सामने बाकी असलेल्या हैदराबादला आणखी एकसुद्धा पराभव परवडणारा नाही. राजस्थानची स्थिती त्या तुलनेत बरी आहे.

जोफ्रा आर्चरवर राजस्थानच्या गोलंदाजीची धुरा आहे, तर मनगटी फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाळ आणि राहुल तेवतिया आपली भूमिका चोख बजावत आहेत. फलंदाजीत जोस बटलर सातत्याने धावा करीत आहे. चेन्नईविरुद्ध कर्णधार स्टीव्ह स्मिथने त्याला उत्तम साथ दिली. राजस्थानला चांगल्या भागीदाऱ्या करून देणाऱ्या फलंदाजांची आवश्यकता आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स अद्याप दर्जाला साजेशी खेळी साकारू शकला नाही. रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसन सातत्याने अपयशी ठरत आहेत. त्यामुळे पंजाबचा फलंदाज मनन व्होराला संधी मिळू शकते.

दुसरीकडे, हैदराबादला कोलकाता नाइट रायडर्सकडून सुपर ओव्हरमध्ये पत्करलेल्या पराभवातून सावरण्याचे आव्हान असेल. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू मिचेल मार्श नसल्याची तीव्र उणीव हैदराबादला भासत आहे. हैदराबादची फलंदाजीची फळी कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि केन विल्यम्सन यांच्यावर अवलंबून आहे.

*  सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या