विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामात चांगल्याच फॉर्मात आहे. बुधवारी अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात RCB ने KKR चा ८ गडी राखून धुव्वा उडवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. KKR ने विजयासाठी दिलेलं ८५ धावांचं आव्हान RCB ने सहज पूर्ण केलं. RCB कडून फिंच आणि पडीकल यांनी आश्वासक सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली.

सलामीचे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर गुरकिरत मान आणि विराट कोहली यांनी संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. विराटने नाबाद १८ तर गुरकिरतने नाबाद २१ केला. विराटने आपल्या १८ धावांमध्ये दोन चौकार लगावत आयपीएलच्या इतिहासात ५०० चौकारांचा टप्पा पूर्ण केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर आहे.

त्याआधी, मोहम्मद सिराज, ख्रिस मॉरिस, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फॉर्मात असलेल्या गोलंदाजांसमोर अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी संपूर्णपणे हार पत्करल्याचं पहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा KKR चा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला. सुरुवातीच्या षटकांपासून KKR च्या डावाला लागलेली गळती थांबवण्यात संघाचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकांत संघ अवघ्या ८४ धावांपर्यंत मजल मारु शकला.