मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) साखळीमधील अखेरची लढत सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सदरम्यान होणार आहे. प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी सनरायझर्सला हा सामना जिंकावाच लागणार आहे. मुंबई, दिल्ली कॅपीटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या तिन्ही संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर गुणतालिकेच्या तळाला असणाऱ्या तीन संघाचे आवाहन कधीच संपुष्टात आलं आहे. आवाहन संपुष्टात आलेल्या संघांमध्ये धोनीचा चेन्नई सुपरकिंग्स, के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा किंग्स इलेव्हन पंजाब आणि स्टीव्ह स्मिथ नेतृत्व करणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या संघाचा समावेश आहे. बेंगळुरु या स्पर्धेत टिकून राहण्यामागे आणि चेन्नई या स्पर्धेमधून बाहेर पडण्यासंदर्भात एक समान धागा असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. एक संघ टिकून राहण्यासाठी आणि आतापर्यंत खेळलेल्या सर्व आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये जाणारा संघ यंदा अचानक बाहेर पडण्यामागे समान धागा आहे तो म्हणजे तरुण खेळाडूंना संधी देणे. विराट कोहलीने तरुण खेळाडूंना संधी न देण्याची चूक केली नाही. मात्र हीच चूक धोनीला आणि सीएसकेला महागात पडल्याचे शेवटच्या तीन सामन्यामध्ये प्राकर्षाने जाणवले.

धोनीची चूक…

चेन्नई सुपरकिंग्सचा संघ यंदा आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडलेला पहिला संघ ठरला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या संघातील वयस्कर आणि कोअर टीमचे सदस्य असणाऱ्या खेळाडूंवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवल्याची चर्चा आहे. याचमुळे धोनीने यंदाच्या आयपीएलमध्ये तरुण खेळाडूंना फारशी संधी दिली आहे. तसेच ज्यांना संधी देण्यात आली त्यांना संघ स्पर्धेमधून बाहेर पडल्याचे निश्चित झाल्यानंतर संधी देण्यात आल्याने हे धोनीला उशीरा सुचलेलं शहाणपण होतं अशी टीकाही अनेकांनी केली. धोनीने एका सामन्यानंतर तरुण खेळाडूंमध्ये तो स्पार्क दिसत नाही असं सांगितलं होतं. तरुण खेळाडूंमध्ये स्पार्क दिसत नसल्यानेच त्यांना संधी देण्यात येत नसल्याचे धोनी म्हणाला होता. अखेर संघ प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडल्यानंतर धोनीच्या सीएसकेने तरुण खेळाडूंना संधी दिली. २३ वर्षीय ऋतुराज गायकवाडने मिळालेल्या संधीचं सोनं करत सलग तीन अर्धशतके ठोकली. ऋतुराजच्या कामगिरीने धोनीने तरुण खेळाडूंवर आधीच विश्वास टाकला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं अशा चर्चांना तोंड फुटले.

विराटचे शहाणपण…

दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार असणाऱ्या विराट समोरही धोनीसारखेच प्रश्न होते. तरुण खेळाडूंना संधी द्यावी की जुन्या खेळाडूंवर विश्वास ठेवावा हा प्रश्न विराटसमोरही होता. मात्र विराटने या प्रश्नाला त्याच्या पद्धतीने सोडवण्याचा निर्णय घेतला. मागील हंगामामध्ये पूर्णवेळ संघाबाहेर बसवून ठेवलेल्या देवदत्त पडीकलला यंदा विराटने पहिल्या सामान्यापासूनच संधी दिली. केवळ संधीच दिली नाही तर देवदत्तला विराटने सलामीला पाठवलं. विराटने व्यक्त केलेला विश्वास आणि घरगुती स्पर्धांमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावरच देवदत्तने यंदाचे आयपीएल खऱ्या अर्थने गाजवले. देवदत्तने १४ सामन्यांमध्ये ३३.७१ च्या सरासरीने ४७२ धावा केल्या आहेत. या मालिकेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. केवळ के. एल. राहुल (६७० धावा) आणि शिखर धवन (५२५ धावा) हे दोघेच देवदत्तपेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू आहेत.

बेंच ते मॅच विनर…

देवदत्तच्या कामगिरीमुळे विराटला मोठा दिलासा मिळाला आहे. देवदत्त हा मागील वर्षीही आयपीएलच्या बाराव्या हंगामामध्ये आरसीबीच्या संघाचा भाग होता. मात्र त्यावेळी विराटने देवदत्तवर फारसा विश्वास दाखवला नाही. त्यामुळेच घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये भन्नाट कामगिरी केल्यानंतरही मागील वर्षीच्या आयपीएलमध्ये देवदत्तला आरसीबीकडून एकदाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. विराटने देवदत्तला संपूर्ण हंगामामध्ये राखीव खेळाडू म्हणून बेंचवर बसवून ठेवलं. मात्र मागील हंगामामध्ये एकही सामना न खेळणाऱ्या देवदत्तमुळेच आज आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचली आहे असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. आरसीबीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये यंदा देवदत्त पहिल्या क्रमाकांवर आहे. विराट, ए.बी डिव्हिलियर्ससारखे दिग्गज संघात असतानाही देवदत्तने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.