युएईत सुरु असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम आता मध्यावधीवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक संघाने साखळी फेरीतले आपला सात सामने पूर्ण केल्यानंतर गव्हर्निंग काऊन्सिलच्या नियमाप्रमाणे Mid Transfer Window ची संधी सर्व संघांसाठी निर्माण करण्यात आली आहे. या सुविधेनुसार दोन संघ आपापसात चर्चा करुन खेळाडूंची अदलाबदल करु शकतात. एरवी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा चेन्नईचा संघ यंदा खराब कामगिरीमुळे गुणतालिकेत खालच्या स्थानावर फेकला गेला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणेला संघात स्थान द्यावं अशी मागणी होत होती. परंतू चेन्नईचा संघ कोणत्याही नव्या खेळाडूच्या शोधात नसल्याची माहिती संघाचे CEO काशी विश्वनाथन यांनी दिली आहे.

अवश्य वाचा – Video : ‘कॅप्टन कूल’ को जब गुस्सा आता है ! कर्ण शर्मावर मैदानाच भडकला धोनी

“चेन्नईने आतापर्यंत हंगामाच्या मध्यावधीत कधीही कोणत्याही खेळाडूला करारमुक्त केलं नाही तसंच कोणत्याही नवीन खेळाडूला संधी दिलेली नाही. खरं सांगायला गेलं तर गव्हर्निंग काऊन्सिलचे Mid Transfer Window चे नियमही आम्ही वाचलेले नाहीत. आम्ही कोणत्याही नवीन खेळाडूच्या शोधात नाही आहोत.” ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना विश्वनाथन यांनी माहिती दिली.

अवश्य वाचा – IPL 2020 : तब्बल ६ वर्षांची तपश्चर्या दुबईच्या मैदानात भंग

स्पर्धेत काही खेळाडूंना संधी मिळते तर काहींना नाही. परंतू लिलावात काही खास रणनिती आखून खेळाडूंची संघात निवड केली जाते. त्यामुळे कधी संघातील काही खेळाडूंची कामगिरी चांगली झाली नाही तर तुमच्याकडे प्लान A सोबतच B, C, D देखील तयार असतात असं म्हणत विश्वनाथन यांनी चेन्नईचा संघ बाहेरच्या संघातील खेळाडूंना संधी देणार नसल्याचं स्पष्ट केलंय.