आयपीएलच्या तेराव्या हंगामात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सवर कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक बोली लावली. कमिन्स सर्वात महागडा खेळाडू ठरल्यामुळे तो यंदाच्या हंगामात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष होतं. दुर्दैवाने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कमिन्सला आपली चमक दाखवता आली नाही. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कमिन्सची धुलाई केली.

मात्र या अपयशाने खचून न जाता कमिन्सने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं. कमिन्सच्या गोलंदाजीवर स्कूप फटका खेळण्याचा प्रयत्न करणारा बेअरस्टो झेलबाद झाल्याचं अपील पंचांनी उचलून धरलं. परंतू तिसऱ्या पंचांच्या पाहणीत बेअरस्टो नाबाद असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर कमिन्सने सुरेख टप्प्यावर चेंडू टाकत बेअरस्टोचा त्रिफळा उडवला. त्याची गोलंदाजी पाहून भारताचा माजी खेळाडू युवराज सिंहनेही कमिन्सचं कौतुक केलं. अपयश आल्यानंतर खचून न जाता सराव करुन पुनरागमन कसं करायचं हे आज कमिन्सने दाखवून दिल्याचं युवराज म्हणाला.

दरम्यान, सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या तेराव्या हंगामात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेणारा वॉर्नर पहिला कर्णधार ठरला आहे.