IPL 2020चा धूम सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. मंगळवारी स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना मुंबई आणि हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्यात हैदराबादचा संघ जिंकला तर तो प्ले-ऑफ्स फेरी गाठेल आणि जर मुंबईला विजय मिळाला तर कोलकाताचा संघ प्ले-ऑफ्समधील आपलं स्थान पक्कं करेल. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू हे तीन संघ प्ले-ऑफ्समध्ये पोहोचले आहेत. या चार संघांमध्ये प्ले-ऑफ्सचे सामने खेळवले जातील आणि नंतर १० नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल.

IPL 2020 संपल्यानंतर साऱ्याच संघांना आणि क्रिकेट चाहत्यांना IPL 2021चे वेध लागतील. यंदाचं IPL मुळे उशिरा खेळवण्यात आले. पण पुढच्या वर्षीचं IPL नेहमीप्रमाणे एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीतच खेळवण्याकडे BCCIचा कल आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात IPL 2020 साठीची लिलाव प्रक्रिया पार पडली होती. पण यंदा मूळ स्पर्धाच उशिरा होत असल्याने IPL 2021 Auction नक्की कसं असेल? याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. याच प्रश्नाचं उत्तर BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिलं.

“IPL 2021साठी होणारी लिलाव प्रक्रिया (Auction) कशी असेल याबद्दल आम्ही अद्याप काहीही ठरवलेलं नाही. पहिले यंदाचा हंगाम संपू दे. त्यानंतर चर्चा करून IPL 2021 Auction बद्दल निर्णय घेतला जाईल. सध्या तरी इतकीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर कोविडवरील लशीचे संशोधन पूर्ण व्हावं आणि IPL 2021 निर्विघ्नपणे आयोजित करता यावं”, असं गांगुली म्हणाला.