चेन्नईविरूद्धच्या सामन्यात इशान किशनने केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या बळावर मुंबईने दणदणीत विजय साजरा केला. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांनी गुडघे टेकत फक्त ११४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर इशान किशन (६८*) – क्विंटन डी कॉक (४६*) जोडीने मुंबईला १० गडी राखून विजय मिळवून दिला. १० गड्यांनी पराभव होण्याची ही चेन्नईच्या संघाची संपूर्ण IPL कारकिर्दीतील पहिलीच वेळ ठरली.

चेन्नईच्या या मानहानीकारक पराभवानंतर धोनी स्वत:ला संघाबाहेर ठेवून उर्वरित ३ सामन्यांसाठी नव्या चेहऱ्याला संधी देणार अशी चर्चा रंगू लागली होती. याबाबच धोनीनेच स्वत: उत्तर दिलं. “आम्हाला आता पुढच्या वर्षीच्या दृष्टीने विचार करायची गरज आहे. लिलावात कोणाला घ्यायचं आणि कोणाला करारमुक्त करायचं याचा अभ्यास या तीन सामन्यात बारकाईने केला जाईल. जास्तीत जास्त खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी दिली जाईल. या उरलेल्या ३ सामन्यात पुढील वर्षांची तयारी केली जाणार आहे. आणि अशा परिस्थितीत कर्णधाराने कधीच पळून जायचं नसतं, त्यामुळे मी तीनही सामन्यात खेळणार हे नक्की”, असं धोनीने स्पष्ट केलं.

असा रंगला सामना…

नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईची सुरूवात खूपच खराब झाली. ऋतुराज गायकवाड (०), अंबाती रायडू (२), जगदीशन (०), फाफ डु प्लेसिस (१) आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजा (७) हे फलंदाज पॉवरप्लेमध्येच बाद झाले. कर्णधार धोनीही स्वस्तात (१६) बाद झाला. पण नवख्या सॅम करनने एकाकी झुंज देत संघाला शंभरी पार करून दिली. त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. ट्रेंट बोल्टने ४ गडी टिपले. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशन आणि क्विंटन डी कॉक जोडीनेच मुंबईला विजय मिळवून दिला. इशान किशनने नाबाद ६८ तर क्विंटन डी कॉकने नाबाद ४६ धावा केल्या.