इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामामध्ये मुंबई इंडियन्सने फायन्समध्ये धडक मारली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा ५७ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने फलंदाजी करत २० षटकांमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यात २०० धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला केवळ १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबई इंडियन्सने प्लेऑफच्या पहिल्याच सामन्यात हा विजय मिळवत सहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मुंबईचा संघ त्यांच्या फंलदाजांच्या आणि गोलंदाजांच्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर प्लेऑफमध्ये पोहचली. मात्र प्लेऑफमधील पहिल्याच सामन्यात त्यांनी मिळवलेल्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो जसप्रीत बुमराह. या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह हाच मुंबईच्या संघाचा सर्वात मोठा मॅच विनर असल्याचे पुन्हा एका सिद्ध झालं. मुंबईला विजय मिळवून देण्यात या हंगामामध्ये अनेकदा कर्णधार रोहितपेक्षा बुमराहची कामगिरी कायम उजवी राहिल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये रंगत आहे.

नक्की पाहा >> IPL 2020 : पुरंदरचा ऋतुराज गायकवाड झाला मालामाल; ‘या’ कंपनीबरोबर केला मोठा करार

महान खेळाडू कायमच अगदी महत्वाच्या सामन्यामध्ये आपली योग्यता सिद्ध करतो. असं काहीसं काल घडलं बुमराहबद्दल. मुंबई इंडियन्सच्या या हुकुमी एक्क्याने दिल्ली कॅपीटल्सच्या फलंदाजांवर आपल्या गोलंदाजीचा असा टिच्चून मारा केला की त्याची गोलंदाजी समजण्याआधीच दिल्लीने सामना गमावला होता. बुमराहने चार षटकांमध्ये केवळ १४ धावा देत चार गडी बाद केले. आयपीएलच्या करियरमधील बुमराहची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच मुंबईच्या कोणत्याही खेळाडूने प्लेऑफ किंवा नॉक आऊट स्टेजच्या सामन्यांमध्ये केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरलीय.

बुमराहने या हंगामामध्ये दुसऱ्याचा चार बळी घेण्याचा पराक्रम केलाय. असा विक्रम करणारा बुमराह हा एकमेव खेळाडू आहे. या आयपीएलमध्ये बुमराहने आतापर्यंत एकूण २७ बळी घेतले आहेत. एकाच आयपीएलच्या हंगामामध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून बुमराह आता पहिल्या स्थानी आहे. यापूर्वी हा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर होता. भुवनेश्वरने एकाच हंगामामध्ये २६ विकेट्स घेतल्या होत्या. यावरुनच बुमराहने रोहित किंवा हार्दिक पांड्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट सामन्यामध्ये खास कामगिरी करण्याऐवजी कामगिरीमधील सातत्य कायम राखण्याचे दिसत आहे.

दिल्लीविरोधात मुंबई इंडियन्सला ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकामध्ये भन्नाट सुरुवात करुन दिली. पहिल्याच षटकामध्ये बोल्टने दोन गडी माघारी पाठवले. मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेल्या बुमराहने यंदांच्या हंगामामध्ये दिल्लीकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शिखर धवनला बोल्ड केलं. दिल्लीच्या संघाचं खातं उघडण्याआधीच तीन खेळाडू तंबूत परतल्याने अवघ्या आठ चेंडूंमध्येच दिल्लीचा पराभव होणार हे जवळजवळ निश्चित झालं. त्यानंतर बुमराहने कर्णधार श्रेयस अय्यरलाही बाद केला.

नक्की पाहा >> IPL 2020: मुंबईची रनमशीन… एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळता सूर्यकुमारने केला हा पराक्रम

बुमराहने ६५ धावांची भन्नाट खेळी करणाऱ्या स्टायनिसलाही इन स्विंगवर बोल्ड केलं. डॅनियल सॅम्सलाही बुमराहनेच यॉर्करच्या मदतीने तंबूत पाठवलं. बुमहारने जवळजवळ सर्व प्रकारचे चेंडू फलंदाजांना टाकले आणि त्यामुळेच गोंधळून गेलेल्या फलंदाजांना त्यांच्या गोलंदाजीवर धावा तर काढता आल्या नाहीच मात्र विकेट्सही वाचवता आल्या नाहीत. बुमराहने अशीच कामगिरी शेवटच्या सामन्यात केली तर मुंबई नक्कीच पाचव्यांदा आयपीएलच्या जेतेपदाची माळ गळ्यात घालेल यात शंका नाही.