IPL 2020मध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात करुन विजयी सलामी देणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जला दुसऱ्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. राजस्थान रॉयल्सने चेन्नईवर १६ धावांनी मात करत पहिला विजय नोंदवला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या २१७ धावांचा पाठलाग करताना चेन्नईने २०० धावा केल्या. २१७ धावांचे आव्हान असताना धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणं पसंत केलं. ज्यामुळे सोशल मीडियावर चाहते नाराज आहे. संघाला गरज असताना धोनी उशीरा फलंदाजीला येऊन काय साध्य करतोय? असा सवाल साऱ्यांनीच विचारला. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही धोनीच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करुन टीका केली.

गंभीर आणि धोनी यांच्यात विसंवाद असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. गंभीर धोनीच्या काही निर्णयांवर ताशेरेदेखील ओढले आहेत. इतकेच नव्हे तर संघात अनेकवेळी त्यांच्यात वाद झाल्याचेही दिसून आले आहे. धोनीवर टीका करण्याची एकही संधी गंभीर सोडत नाही हे गेल्या काही वर्षांत दिसले आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांनी गंभीरच्या या वक्तव्यानंतर गंभीरवर टीका केली. सध्या गाजणारे प्रकरण म्हणजे कंगना रणौत आणि मुंबई प्रशासन यांच्यातील वाद. गेले काही दिवस कंगना मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकार यांच्या कारभारावर सातत्याने टीका करताना दिसते आहे. त्याचा संदर्भ घेऊन काही ट्विटर युजर्सने गंभीरची कंगनाशी तुलना केली आहे. पाहूया काही भन्नाट ट्विट्स-

काय म्हणाला होता गंभीर?

“खरं सांगायला गेलं तर मला थोडं आश्चर्य वाटलं. धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो?? ऋतुराज गायकवाड, सॅम करन यासारख्या फलंदाजांना आधी संधी देऊन काय साध्य करायचं होतं. तू कर्णधार आहेस तर त्याप्रमाणे पुढे येऊन नेतृत्व करणं अपेक्षित आहे. धोनीने जे केलं त्याला नेतृत्व करणं म्हणत नाहीत. २१७ चं आव्हान असताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन काय उपयोग…सामना तर केव्हाच संपला होता”, असं गंभीर म्हणाला.