IPL कारकिर्दीत पहिलं शतक झळकावणाऱ्या शिखर धवनने (१०१*) चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला. चेन्नईने विजयासाठी दिलेलं १८० धावांचं आव्हान दिल्लीने ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. त्यावेळी नियमित गोलंदाज डॅरेन ब्राव्होच्या जागी रविंद्र जाडेजाला गोलंदाजी देण्यात आली. जाडेजाच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने ३ षटकार लगावत दिल्लीला विजय मिळवून दिला. या पराभवानंतर पुन्हा एकदा केदार जाधवच्या संघातील स्थानावरून टीका सुरू झाली.

दोन सामन्यात केदारला बाहेर ठेवल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा संघात स्थान देण्यात आले. त्या सामन्यातही केदार अपयशी ठरला. तर ड्वेन ब्राव्हो सामन्यात दुखापतग्रस्त झाला. या साऱ्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने रोखठोक मत व्यक्त केलं. “ड्वेन ब्राव्हो दुखापतीने ग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या जागी जोश हेजलवूडला संधी देणं हा योग्य पर्याय आहे. पण चेन्नईचा संघ केदार जाधवला संधी का देतोय हे कळत नाही? जर केदारला संघात खेळवायचा हट्टच असेल तर त्याच्या फलंदाजीचा क्रमांक नीट विचार करून ठरवायला हवा. कारण सध्या तो ज्या क्रमांकावर खेळतो आहे, तेथे त्याचे प्रयत्न व्यर्थ जाताना दिसत आहेत. त्यापेक्षा त्याला संघाबाहेर करून आणखी एक गोलंदाजाला खेळवा आणि प्रतिस्पर्ध्यांना कमी धावांत रोखा”, असं आकाश युट्यूब व्हिडीओमध्ये म्हणाला.

असा रंगला होत सामना-

फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू आणि रविंद्र जाडेजा यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने १७९ धावांचा पल्ला गाठला. शेन वॉटसन आणि डु प्लेसिस जोडीने महत्वपूर्ण भागीदारी केली. या दोघांनंतर अंबाती रायडू (४५*) आणि जाडेजा (३३*) यांनी संघाला १७९चा आकडा गाठून दिला. १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉयनीस आणि अलेक्स कॅरी स्वस्तात बाद झाले. पण शिखरने आपलं पहिलं शतक झळकावत संघाला विजयासमीप नेलं. तर अक्षर पटेलने ५ चेंडूत २१ धावा करत संघाचा विजय साकारला.