कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. एका क्षणाला सामन्यात वरचढ असणारा चेन्नईचा संघ काही क्षणांत बॅकफूटवर फेकला गेला. त्यातच केदार जाधवने मोक्याच्या क्षणी वाया घालवलेले चेंडू आणि संथ फलंदाजी याचा चेन्नईला मोठा फटका बसला. सोशल मीडियावर अनेकांनी केदार जाधवला संघातून वगळण्याची मागणी केली. अनेकांनी जाडेजा-ब्राव्हो या कसलेल्या फलंदाजांआधी जाधवला फलंदाजीसाठी आधी कसं पाठवलं याबद्दलही प्रश्न उपस्थित केले.

चेन्नईच्या पराभवानंतर केदार जाधववर प्रचंड टीका करण्यात आली. भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग याने त्याचा चांगलाच समाचार घेतला. IPL काळात विरेंद्र सेहवाग आपल्या ‘विरू की बैठक’ या कार्यक्रमातून सामन्यांचे विश्लेषण करत असतो. कोलकाताविरूद्धच्या सामन्यानंतर सेहवागने चेन्नईचा फलंदाज केदार जाधववर सडकून टीका केली. “केदार जाधव म्हणजे हुंड्यात आलेल्या मेव्हण्यासारखा (बायकोचा भाऊ) आहे. ना तो धावा करण्यास समर्थ ठरतोय, ना तो चांगलं क्षेत्ररक्षण करत आहे. त्याला संघात घेऊन आता धोनीदेखील विचार करत असेल की खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा आठ करोड का”, अशा शब्दात सेहवागने केदार जाधववर टीकास्त्र सोडलं.

 

View this post on Instagram

 

Catch a fresh episode daily #CricketTogether

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag) on

चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांचाही सेहवागने चांगलाच समाचार घेतला. “कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मिळालेलं आव्हान चेन्नईच्या फलंदाजांनी पूर्ण करायला हवं होतं. सामना चेन्नईच्या हातात होता, पण ज्याप्रकारे केदार जाधव आणि रवींद्र जाडेजा हे दोघे खेळले, त्यामुळे चेन्नईने हातातला सामना गमावला. चेन्नईचे काही फलंदाज हे सरकारी कर्मचारी असल्यासारखे वागतात. त्यांना ही गोष्ट माहिती असते की चांगलं खेळलं काय किंवा वाईट खेळलं काय.. पगार (मानधन) तर मिळणारच आहे”, असं स्पष्ट मत सेहवागने क्रिकबझशी बोलताना व्यक्त केलं.

१६८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने खराब खेळ केला. जाडेजासारखा अनुभवी खेळाडू समोर असतानाही केदार जाधवने शेवटच्या षटकात दोन चेंडू निर्धाव घालवले, त्यामुळे रविंद्र जाडेजाने केलेल्या फटकेबाजीचा उपयोग होऊ शकला नाही आणि चेन्नईला पराभूत व्हावं लागलं.