कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. एका क्षणाला सामन्यात वरचढ असणारा चेन्नईचा संघ काही क्षणांत बॅकफूटवर फेकला गेला. त्यातच केदार जाधवने मोक्याच्या क्षणी वाया घालवलेले चेंडू आणि संथ फलंदाजीचा चेन्नईला आणखीनच फटका बसला. सोशल मीडियावर अनेकांनी केदार जाधवला संघातून वगळण्याची मागणी केली. अनेकांनी जाडेजा-ब्राव्हो या कसलेल्या फलंदाजांआधी जाधवला फलंदाजीसाठी आधी कसं पाठवलं याबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण केलं. चेन्नई सुपरकिंग्जचा प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगने याला उत्तर दिलं आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : CSK ने हातातला सामना गमावल्यावर धोनी म्हणतो, फलंदाजांनी निराश केलं !

“एका क्षणाला आम्हाला असं वाटलं की केदार जाधव फिरकीपटूंचा चांगला सामना करु शकतो. तो त्यांच्यावर दबाव आणून फटकेबाजी करेल असं आम्हाला वाटलं आणि गरज पडल्यास जाडेजा फिनीशरची भूमिका निभावेल असा आमचा अंदाज होता. परंतू सरतेशेवटी आव्हान अधिकच खडतर होत गेलं आणि आम्ही कमी पडलो. मधल्या फळीत केदार जाधवने फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. म्हणूनच त्याला जाडेजा-ब्राव्होच्या आधी संधी देण्यात आली होती, पण दुर्दैवाने केदार अपयशी ठरला.” स्टिफन फ्लेमिंगने सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

दरम्यान, १६८ धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. फाफ डु-प्लेसिस आणि शेन वॉटसनने सुरुवातीच्या षटकांमध्ये काही चांगले फटके खेळले. शिवम मवीने डु-प्लेसिसला माघारी धाडत चेन्नईला पहिला धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या अंबाती रायुडूने शेन वॉटसनला चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत चेन्नईचा डाव सावरला. ही जोडी चेन्नईला विजयपथावर घेऊन जाणार असं वाटत असतानाच कमलेश नागरकोटीने रायुडूला माघारी धाडलं. दुसरीकडे शेन वॉटसनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, मात्र यानंतर लगेचच तो नारायणच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला.

अवश्य वाचा – IPL 2020 : CSK चे चाहते केदार जाधवर नाराज, हे ३ खेळाडू घेऊ शकतात संघात त्याची जागा

मोक्याच्या क्षणी कोलकाताच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्यामुळे चेन्नईचा संघ काहीसा बॅकफूटवर गेला. दिनेश कार्तिकने सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांचा सुरेख वापर करत चेन्नईच्या फलंदाजांवर दबाव आणला. महेंद्रसिंह धोनीने हा दबाव झुगारत फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण यात त्याला अपयश आलं. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो ११ धावा काढून माघारी परतला. त्याच्या सोबत असलेला सॅम करनही आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना माघारी परतला. यानंतर चेन्नईचे फलंदाज सामन्यात पुनरागमन करु शकले नाहीत. कोलकात्याकडून शिवम मवी, वरुण चक्रवर्ती, नागरकोटी, नारायण आणि रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.