क्विंटन डी-कॉकचं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांमध्ये पोलार्ड, कुल्टर-नाईल जोडीने केलेली फटकेबाजी यांच्या जोरावर मुंबईने पंजाबविरुद्ध १७६ धावांचा पल्ला गाठला. मुंबईच्या आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी चाहत्यांची निराशा केली. पण डी कॉकने एक बाजू लावून धरत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर अखेरच्या फळीत पोलार्ड आणि कुल्टर नाईल जोडीने पंजाबच्या गोलंदाजांना चांगलाच दणका दिला. कायरन पोलार्डने तुफान फटकेबाजी करत मुंबईच्या संघाला चांगली धावसंख्या गाठून दिली. पोलार्डने डावात अवघे १२ चेंडू खेळले पण त्या खेळीत त्याने तब्बल ४ षटकार आणि १ चौकार लगावला. पोलार्डने १२ चेंडूत नाबाद ३४ धावा कुटल्या.

पाहा कायरन पोलार्डची तडाखेबाज खेळी-

दरम्यान, नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा ९ धावांवर त्रिफळाचीत झाला. सूर्यकुमार यादवही लवकर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या इशान किशननेही निराशा केली. एकीकडे मुंबईचे फलंदाज माघारी परतत असताना डी कॉकने एक बाजू लावून धरली. त्याने ४३ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. १७ व्या षटकांत मुंबईची अवस्था ६ बाद ११९ अशी झाली होती. यानंतर कायरन पोलार्ड आणि नॅथन कुल्टर-नाईल या दोघांनी २१ चेंडूत नाबाद ५७ धावांची भागीदारी केली. पोलार्डने नाबाद ३४ आणि कुल्टर नाइलने नाबाद २४ धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी, अर्शदीप सिंहने प्रत्येकी २-२ तर ख्रिस जॉर्डन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.