सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या मुंबई इंडियन्सने दमदार पुनरागमन केलं. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवत मुंबईने तेराव्या हंगामातला पहिला विजय नोंदवला. युएईतला मुंबईचा हा पहिला विजय होता. याआधी २०१४ साली आयपीएलचे काही सामने युएईत खेळवण्यात आले. मुंबई इंडियन्सला यापैकी पाचही सामन्यांत पराभवाचा स्विकार करावा लागला होता. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डसाठी हा सामना अतिशय खास होता.

मुंबई इंडियन्सकडून १५० वा आयपीएल सामना खेळणारा खेळाडू हा बहुमान पोलार्डने पटकावला. या सामन्याआधी मुंबईच्या टीम मॅनेजमेंटने पोलार्डचं कौतुक करत त्याला खास १५० नंबरची जर्सी दिली होती. सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या मालक निता अंबानी यांनी पोलार्डला खास फोन करुन त्याच्या या विशेष कामगिरीबद्दल त्याचं कौतुक केलं.

गेल्या काही वर्षांपासून कायरन पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू मानला जातो. मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी असो किंवा मोक्याच्या क्षणी गोलंदाजी करुन संघाला विकेट मिळवून देणं अशा सर्व बाबतीत पोलार्ड आपली जबाबदारी पार पाडतो. यंदाच्या कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेतही पोलार्डच्या त्रिंबागो नाईट रायडर्स संघाने धडाकेबाज कामगिरी करत विजेतेपद पटकावलं. त्यामुळे आयपीएलमध्ये पोलार्ड मुंबईकडून खेळताना अशी कामगिरी करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.