हैदराबादविरूद्ध झालेल्या अतिशय चुरशीच्या लढतीत पंजाबच्या संघाने १२ धावांनी रोमांचक विजय मिळवला. हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पंजाबच्या संघाला २० षटकात १२६ धावांवर रोखलं होतं. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात दमदार झाली, पण नंतर पंजाबचा गोलंदाज ख्रिस जॉर्डन आणि इतर फिरकीपटूंचा सामना करणं न जमल्याने हैदराबादला पराभव पत्करावा लागला. हैदराबादच्या हातून विजयश्री खेचून पंजाबने स्पर्धेतील आव्हान कायम राखले. पंजाब संघाने या सामन्यात लढाऊवृत्ती दाखवत विजय मिळवला. याचे श्रेय माजी फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर यांनी एका खास व्यक्तीला दिलं.

“पंजाबच्या संघाला यशाचा मार्ग सापडताना दिसतोय. स्पर्धेच्या सुरुवातीला ते काहीसे हरवल्यासारखे खेळत होते. अनेक सामन्यात ते उत्तम खेळले. पण सामना शेवटच्या षटकापर्यंत जायचा आणि तिथे ते कमी पडायचे. पहिल्याच सामन्यात ते सुपर ओव्हरमध्येही पराभूत झाले होते. पण राहुलने संघाचं उत्तम नेतृत्व केलं. कर्णधार म्हणून हळूहळू त्याच्यात सुधारणा दिसते आहे. गेल्या सामन्यात त्याने फारशा धावा केल्या नाहीत पण त्याने कर्णधार म्हणून घेतलेले निर्णय अप्रतिम होते”, असे गावसकर म्हणाले.

“पंजाबमध्ये लढाऊवृत्ती दिसून येते आहे आणि अशा वेळी आपण अनिल कुंबळेला विसरू शकत नाही. कुंबळे त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत एक लढवैय्या खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. त्याने जबड्याला दुखापती झाली असूनही पट्टी बांधून गोलंदाजी केली होती. तीच लढाऊवृत्ती आता पंजाबच्या संघात दिसून येते आहे”, असंही गावसकर म्हणाले.